Rahul Gandhi Convoy Accident : उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या ताफ्यातील पाच गाड्या एका रुग्णवाहिकेवर आदळल्या. या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झालेले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौपासून १०० किमी अंतरावर असलेल्या हलियापूर येथे झालेला हा अपघात ताफ्याच्या मागील भागात असलेल्या पाच गाड्यांमध्ये झाला. राहुल गांधी सुरक्षित आहेत. जखमींमध्ये ताफ्यासोबत प्रवास करणारे पक्ष कार्यकर्ते, अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते.
राहुल गांधी लखनौ विमानतळावर पोहोचले होते, तिथून ते सुलतानपूरमधील खासदार/आमदार (MP/MLA) विशेष न्यायालयात जात होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीप्रकरणी २०१८ मध्ये दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात आज (दि. २६) निकाल अपेक्षित आहे. राहुल गांधींचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नेते जमले होते.