नवी दिल्ली : राहुल गांधींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा सभागृहात मांडला होता. हा मुद्दा मांडत असताना राहुल गांधींना सत्तापक्षाचा विरोध सहन करावा लागला होता. आता या अधिवेशनातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणाले होते की, "तुम्हाला माझा जेवढा अपमान करायचा आहे तेवढा अपमान आनंदाने करा, रोज करा, मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही जातीनिहाय जनगणनेसंदर्भातील निर्णय या ठिकाणी पारित करूनच राहू." तेव्हा भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी सभागृहातच राहुल गांधींच्या जातीवर प्रश्न उपस्थित केला होता.
त्यानंतर बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेला मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर राहुल गांधींचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. काँग्रेस नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडूनही हा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल करत राहुल गांधींमुळेच जातीनिहाय जनगणनेचा निर्णय सरकारला घ्यावा लागला, अशाही प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्त्यांच्या होत्या. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाचे समर्थन करताना सामाजिक न्यायासाठी आवश्यक असल्याचे सांगत आहे. म्हणजे भाजप राहुल गांधींच्या भुमिकेची री ओढत आहे.
यापूर्वी कोरोना काळातही राहुल गांधींनी कोरोनाच्या संकटावर भाष्य केले होते. त्यानंतर राहुल गांधी भविष्यवेत्ते आहेत का, अशा प्रकारची टीका करत त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रकार देखील झाला होता. मात्र त्यानंतर कोरोना विषाणूमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जातनिहाय जनगणनेचा मुद्दा राहुल गांधींनी अगदी सुरुवातीपासून लावून धरला. लोकसभा निवडणुकीच्या आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर भर दिला. लोकसभा विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी जेवढ्या सभा घेतल्या त्या प्रत्येक सभेमध्ये, देशाच्या प्रत्येक भागामध्ये जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर भर दिला होता. केंद्र सरकारला अखेर यावर निर्णय घ्यावा लागला.