लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी. Pudhari News
राष्ट्रीय

Rahul Gandhi : सर्व तरुणांसह आम्हा सर्वांना अटक करा : राहुल गांधींनी जाहीर केला CEC विरोधातील तरुणांच्‍या आंदोलनास पाठिंबा

'एक्स'वर एका व्हिडिओ शेअर करत केली पंतप्रधान नरेंद्र मोदींसह आरएसएसवर टीका

पुढारी वृत्तसेवा

Rahul Gandhi CEC protest : "पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्हाला जे करायचे ते करा. संपूर्ण पोलिस दल कामाला लावा. सर्व नेत्यांना अटक करा. सर्व तरुणांना तुरुंगात टाका. हवे तर आम्हा सर्वांनाच अटक करा," असे आव्हान देत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (दि. १० ऑक्टोबर) मतदारयाद्यांच्या 'विशेष सखोल पुनरावृत्ती' (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमिततेमुळे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलक तरुणांना पाठिंबा जाहीर केला.

"त्यांचा मूळ स्वभाव भ्याडपणाचा"

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एका व्हिडिओ संदेशामध्ये राहुल गांधी म्हणाले की, "सत्ताधारी भाजपचे वैचारिक मार्गदर्शक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपण गेल्या दशकाहून अधिक काळ लढा देत असून, त्यांना आपण तळहाताच्या रेषांप्रमाणे पुरते ओळखतो. या लोकांचा मूळ स्वभावच भ्याडपणाचा आहे."

मतचोरीची आपल्याकडे सर्व माहिती

"पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याभोवतीचा फास आता हळूहळू आवळत चालला आहे. आम्ही तो फास अधिक घट्ट करत आहोत." भाजपने 'मते चोरली' असून, आपल्याकडे याबाबत "आवश्यक ती सर्व माहिती" उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला.

संविधानावर घाला घालणाऱ्यांचा पराभव करणारच

"गेल्या १०-१५ वर्षांत भारताचे जे नुकसान केले गेले, त्याची पुनरावृत्ती पुन्हा कधीही घडू देणार नाही, याची खात्री आम्ही देऊ. देशाच्या तरुणांनो, मला तुमचा सार्थ अभिमान आहे. आपले आंदोलन सुरूच ठेवा. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या राजवटीला आणि आपल्या संविधानावर घाला घालणाऱ्यांना आपण पराभूत केल्याशिवाय राहणार नाही," असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT