Rahul Gandhi Supports CJP Protest: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनादरम्यान तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही. असे केल्याबद्दल तरुणांना तुरुंगात पाठवणे म्हणजे 'कायरता' आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.
कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) कार्यकर्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली. CJP चे सदस्य अजिंक्य शिंदे यांच्या माहितीनुसार, जंतर-मंतरजवळ आंदोलन सुरू असताना या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत आंदोलनकर्त्यांची बाजू मांडली. जंतर-मंतरवरील शांततापूर्ण आंदोलनात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरू शकत नाही. यासाठी तरुणांना तुरुंगात पाठवणे ही कायरता असल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच विद्यार्थी, तरुण, पत्रकार आणि ‘इंडिया’ आघाडी या सर्वांचे झेंडे आणि बॅनर वेगवेगळे असले, तरी त्यांचा उद्देश एकच आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. नागरिकांना संविधानाने दिलेल्या अधिकारांची मागणी करण्यासाठी हे सर्वजण आंदोलन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दीपके म्हणाले, “सर्व आंदोलनांचा उद्देश एकच!” ज्ञानेश कुमार यांच्यावर निवडणुकीत कथित गैरप्रकारांचे आरोप; मोदींना सत्तेत ठेवण्यासाठी मदत केल्याचा दावा
या अगोदर अभिजीत दीपके यांनी सांगितलं की, दोन्ही आंदोलने ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात होत आहेत. ज्ञानेश कुमार निवडणुकीत गडबड करून नरेंद्र मोदी यांना सत्तेत कायम ठेवण्यासाठी मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“सर्व आंदोलनांचा उद्देश एकच आहे. ज्ञानेश कुमार निवडणुकीत गैरप्रकार करून नरेंद्र मोदी यांना सत्तेत कायम ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने मदत करत आहेत, त्याविरोधात आम्ही सर्वजण लढत आहोत,” असे दीपके म्हणाले.
राहुल गांधी यांच्या या भूमिकेमुळे CJP च्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळाल्याचे चित्र आहे. शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार आणि तिरंगा फडकवण्याच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.