नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्यात जातीनिहाय जणगणनेवरून चांगलीच खडाजंगी झाली. लोकसभा निवडणुकीसह निकाल लागल्यानंतरही राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा सलग लावून धरला आहे. आजही राहुल गांधींनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. कुठल्याही परिस्थितीत देशात जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, असा आग्रह राहुल गांधी लोकसभेत भाषण करताना करत होते.
दरम्यान, अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर हल्ला चढवला. यावेळी अनुराग ठाकूर म्हणाले की, ज्यांची स्वतःची जात माहिती नाही ते जातीनिहाय जनगणनेवर बोलतात. यावर राहुल गांधींनी ही तेवढेच कडक उत्तर दिले. देशातील दलित, आदिवासी, ओबीसी यांचा प्रश्न उपस्थित केला त्याच्या वाट्याला अपमानच येतो. म्हणून तुम्हाला माझा जेवढा अपमान करायचा असेल तो तुम्ही करा, मी तो आनंदाने सहन करेन. मात्र जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचा पुनरुच्चार केला.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी आणि अनुराग ठाकूर यांच्यातील खडाजंगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत अनुराग ठाकूर यांच्यावर टीका केली. “सामाजिक-आर्थिक-जातीय जनगणना ही देशातील ८० टक्के लोकांची मागणी आहे. मात्र आज संसदेमध्ये म्हटले गेले की, ज्यांची जात माहित नाही ते जातीनिहाय जनगणनेबद्दल बोलतात. आता देशाच्या संसदेत ८० टक्के जनतेला अपमानित केले जाणार का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट करावे की हे त्यांच्या सांगण्यानुसार झाले आहे का?, असा प्रश्नही प्रियंका गांधींनी विचारला.