तरुणाईत प्रचंड लोकप्रियता असलेले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी भाजप प्रवेशाच्या अवघ्या २४ तासांत १० लाख फॉलोअर्स गमावले आहेत. Pudhari
राष्ट्रीय

Raghav Chadha |राघव चड्ढांना पक्षांतर नडलं! 'जेन झी'चा मोठा दणका; एका झटक्यात गमावले १० लाख फॉलोअर्स

Raghav Chadha | जुन्या पोस्ट डिलीट केल्याचेही अनेक युजर्सनी निदर्शनास आणून दिले

पुढारी वृत्तसेवा

Raghav Chadha Instagram followers drop

नवी दिल्‍ली: आम आदमी पार्टी (आप) सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा राघव चड्ढा यांचा निर्णय तरुणांना (Gen Z) फारसा रुचलेला दिसत नाही. तरुणाईत प्रचंड लोकप्रियता असलेले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी भाजप प्रवेशाच्या अवघ्या २४ तासांत १० लाख फॉलोअर्स गमावले आहेत.

चड्ढांसह ७ राज्‍यसभा खासदार भाजपमध्‍ये

राघव चड्ढा यांनी 'आप'ला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. चड्ढा यांच्यासोबत 'आप'चे आणखी सहा राज्यसभा खासदारही भाजपमध्ये सामील झाले आहेत, ज्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. काही आठवड्यांपूर्वीच त्यांची 'आप'च्या राज्यसभा उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती, तेव्हापासूनच ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. मात्र, त्यांचा हा निर्णय त्यांच्या तरुण चाहत्यांना आवडलेला नाही.

इंस्‍टाग्राम फॉलोअर्समध्‍ये १० लाखांची घट

सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या ही लोकप्रियतेचा मापदंड मानली जाते. आकडेवारीनुसार, भाजप प्रवेशानंतर २४ तासांच्या आत चड्ढा यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये १० लाखांची घट झाली आहे. शुक्रवारी राघव चड्ढा यांचे १४.६ दशलक्ष (१ कोटी ४६ लाख) फॉलोअर्स होते, जे शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत १३.५ दशलक्ष (१ कोटी ३५ लाख) वर आले आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, विशेषतः 'जेन झी' (Gen Z) कडून या निर्णयाचा तीव्र विरोध होत आहे.

इंस्टाग्रामवर 'अनफॉलो' मोहिम

"इंस्टाग्रामवर सुरू झालेल्या 'अनफॉलो' मोहिमेमुळे २४ तासांत राघव चड्ढा यांचे १० लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत," असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते अनिश गवंडे यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले, "इंटरनेट तुम्हाला रातोरात हिरो बनवू शकते आणि रातोरात शून्यावरही आणू शकते."

राघव चड्ढा यांच्या लोकप्रियतेला ओहोटी?

लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आणि राजकारणात दुर्लक्षित राहणाऱ्या मुद्द्यांना वाचा फोडल्यामुळे राघव चड्ढा यांनी तरुणांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पॅटर्निटी लीव्ह (पितृत्व रजा), वाहतूक कोंडी, टेलिकॉम कंपन्यांचे डेली डेटा लिमिट, विमानतळावरील महागडे समोसे आणि १० मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलमुळे गिग वर्कर्सचे (डिलिव्हरी पार्टनर्स) होणारे शोषण यांसारख्या विषयांवर त्यांनी आवाज उठवला होता. एवढेच नाही तर, गिग वर्कर्सच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी स्वतः एक दिवस 'ब्लिंकिट' डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम केले होते.च्या या प्रयत्नांमुळेच केंद्र सरकारने डिलिव्हरी कंपन्यांना १० मिनिटांची सक्तीची डेडलाईन काढून टाकण्याचे आदेश दिले होते. या सर्व गोष्टींमुळे चड्ढा यांची प्रतिमा एक 'सहज उपलब्ध होणारा नेता' अशी बनली होती. राज्यसभेत तरुणांच्या आकांक्षांना महत्त्व दिल्याने त्यांच्याकडे एका वेगळ्या विचारांचा नेता म्हणून पाहिले जात होते.

एका युजरने केले होते भाकित

राघव चड्ढा यांची 'आप'च्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले, तेव्हाही त्यांना मोठा पाठिंबा मिळाला होता. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचे पती असलेल्या चड्ढा यांनी तेव्हा एक इंस्टाग्राम रील शेअर केली होती, ज्यामध्ये एका युजरने त्यांना स्वतःचा 'जेन झी' पक्ष काढण्याचा सल्ला दिला होता. रिहान नावाच्या त्या युजरने तेव्हाच भाकीत केले होते की, जर चड्ढा यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. चड्ढा यांनी तेव्हा या कल्पनेला 'एक मनोरंजक विचार' असे म्हटले होते. यामुळे ते स्वतःचा नवा पक्ष काढणार अशा चर्चांना उधाण आले होते.

जुन्या पोस्ट डिलीट केल्याचेही अनेक युजर्सनी निदर्शनास आणून दिले

राजकीय विश्लेषक दीक्षा कांडपाल यांनी ट्विट केले की, "राघव चड्ढा यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर जाऊन पहा, तिथे अनेक तरुण त्यांना अनफॉलो करण्यास सांगत आहेत." सध्या सोशल मीडियावर #UnfollowRaghavChadha हा हॅशटॅग ट्रेन्ड होत आहे. चड्ढा यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या जुन्या पोस्ट डिलीट केल्याचेही अनेक युजर्सनी निदर्शनास आणून दिले आहे. 'आप'चे ज्येष्ठ नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे की, चड्ढा यांच्या सोशल मीडिया टाइमलाइनवर आता 'मोदी' उल्लेख असलेल्या फक्त दोनच पोस्ट उरल्या आहेत आणि त्या दोन्ही पंतप्रधानांच्या कौतुकासाठी आहेत. आता हा 'डेटा-ड्रिव्हन' नेता तरुणांमधील आपली लोकप्रियता पुन्हा मिळवू शकणार का, हे येणारा काळच ठरवेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT