BRICS Summit 2026 Vladimir Putin India Visit File Photo
राष्ट्रीय

BRICS परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन दिल्लीत; आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Vladimir Putin India Visit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे BRICS परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले आहेत.

मोहन कारंडे

BRICS Summit 2026 Vladimir Putin India Visit

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे BRICS परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. शुक्रवारी ते दिल्लीतील पालम हवाई दलाच्या विमानतळावर पोहोचले. भारतात आगमन झाल्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पुतीन यांचा ताफा विमानतळावरून रवाना झाला. ते दिल्लीतील आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये मुक्काम करण्याची शक्यता आहे.

पुतीन यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. BRICS परिषदेत सहभागी होण्याबरोबरच पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या नऊ महिन्यांतील पुतीन यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. यापूर्वी ते ५ डिसेंबर २०२५ रोजी भारतात आले होते.

पुतीन यांच्या दौऱ्यामुळे दिल्लीत कडेकोट सुरक्षा

पुतीन यांच्या दिल्ली आगमनापूर्वीच सुरक्षा यंत्रणांनी व्यापक तयारी पूर्ण केली होती. विमानतळापासून हॉटेलपर्यंत आणि तेथून भारत मंडपमपर्यंतच्या मार्गावर विशेष नजर ठेवण्यात येत आहे. BRICS परिषद १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार असून, त्यासाठी विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि सरकारप्रमुख भारतात दाखल होणार आहेत.

पुतीन यांच्या संभाव्य मुक्कामाच्या हॉटेलमध्येही सुरक्षेचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. हॉटेल तसेच परिसरात अनेक स्तरांवर सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रशियाची स्वतंत्र सुरक्षा पथकही यापूर्वीच दिल्लीत दाखल झाले असून, या पथकाने हॉटेल आणि आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आहे.

चार स्तरांचे सुरक्षा कवच; रशियन सुरक्षा पथकही तैनात

पुतीन यांच्या हॉटेलमध्ये चार स्तरांचे सुरक्षा कवच उभारण्यात आले आहे. सर्वांत आतील स्तरावर क्लोज प्रोटेक्शन टीम तैनात असेल. ही टीम पुतीन यांच्या अगदी जवळची सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

तिसऱ्या स्तरावर दिल्ली पोलिसांचे कमांडो आणि निमलष्करी दलाचे जवान असतील, तर बाह्य सुरक्षा स्तराची जबाबदारी स्थानिक पोलिसांकडे असेल. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून प्रत्येक स्तरावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पुतीन यांच्यासोबत रशियाचे स्वतंत्र सुरक्षा पथकही असणार आहे. या पथकात कमांडो आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT