Punjab woman wins Rs 1 crore lottery with Rs 7 ticket  File Photo
राष्ट्रीय

Lottery: नशीब असावं तर असं! कपडे खरेदी करताना सहज ७ रुपयांचं तिकीट घेतलं अन् जिंकली १ कोटींची लॉटरी

पंजाबमधील एका सामान्य कुटुंबातील महिलेचे नशीब अवघ्या सात रुपयांच्या लॉटरी तिकिटामुळे पालटले आहे. मुलांना कपडे खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर सहज म्हणून ७ रुपयांचे लॉटरी तिकीट खरेदी केले होते.

पुढारी वृत्तसेवा

Punjab woman wins lottery

चंदीगढ: पंजाबमधील एका सामान्य कुटुंबातील महिलेचे नशीब अवघ्या सात रुपयांच्या लॉटरी तिकिटामुळे पालटले आहे. मुलांसाठी कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात गेलेल्या बिमला देवी यांनी सहज म्हणून सात रुपयांचे लॉटरी तिकीट खरेदी केले. मात्र, या तिकिटाने त्यांना तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळवून दिले.

लॉटरीत लागलेल्या या बक्षिसामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, मुलांचे भविष्य घडवण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या पैशांचा उपयोग करण्याची त्यांची इच्छा आहे.

पंजाबमधील फरिदकोट जिल्ह्यातील कोटकपुरा येथे बिमला देवी राहतात. त्यांचे पती रोजंदारीवर काम करतात. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत अवघ्या सात रुपयांच्या तिकिटावर एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळला आहे.

रेल्वे स्थानकाजवळून खरेदी केले होते तिकीट

मिळालेल्या माहितीनुसार, बिमला देवी यांनी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या ‘स्टार लॉटरी स्टॉल’वरून हे तिकीट खरेदी केले होते. लॉटरीचा निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी त्यांनी हे तिकीट घेतले होते. अगदी सहज म्हणून केलेली ही खरेदी त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल, याची त्यांना कल्पनाही नव्हती.

बिमला देवी यांनी सांगितले की, “मी काही कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी लॉटरीचे तिकीट घेण्याची इच्छा झाली. मी तिकीट खरेदी करून घरी ठेवले. त्यानंतर लॉटरी विक्रेत्याला फोन केला, तेव्हा त्याने मला लॉटरी लागल्याचे सांगितले.”

तिकिटासाठी किती पैसे खर्च केले, असे विचारले असता त्यांनी केवळ सात रुपये दिल्याचे सांगितले. लॉटरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तिकीट विक्रेते नरेश मोंगा यांनी बिमला देवी यांच्या कुटुंबाला ही आनंदाची बातमी दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी लॉटरी स्टॉलवर जाऊन खात्री केली. मोंगा यांनी त्यांचे अभिनंदन करत मिठाई वाटली. ही बातमी समजताच नातेवाईक, शेजारी आणि परिसरातील नागरिकांनीही आनंदोत्सव साजरा केला.

‘देवाने माझी प्रार्थना ऐकली’

एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्याने बिमला देवी यांना आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी मिळाली आहे. या पैशांचे काय करणार, असे विचारले असता त्या म्हणाल्या, “माझ्याकडे आता खूप पैसे आहेत. मी नोकरी मिळवेन आणि माझ्या मुलालाही नोकरी मिळवून देईन. देवाने माझी प्रार्थना ऐकली. आता मी चांगले आयुष्य घडवेन,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

लॉटरी स्टॉललाही पहिल्यांदाच एक कोटींचे बक्षीस

या लॉटरीमुळे बिमला देवी यांच्यासोबतच तिकीट विक्री करणाऱ्या स्टॉलचीही चर्चा सुरू झाली आहे. ‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, नरेश मोंगा हे गेल्या सहा महिन्यांपासून लॉटरी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. यापूर्वी त्यांच्या स्टॉलवरून विक्री झालेल्या तिकिटांना लाखो रुपयांची बक्षिसे मिळाली होती. मात्र, रेल्वे स्थानकाजवळ स्टॉल सुरू केल्यापासून एखाद्या ग्राहकाला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सात रुपयांच्या तिकिटाने बिमला देवी यांच्या कुटुंबासाठी आशेचा नवा किरण निर्माण केला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या पतीच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या या कुटुंबाला आता आर्थिक स्थैर्य मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT