Proposal viral video
गाझियाबाद: प्रेम व्यक्त करण्याची पद्धत कोणतीही असो, पण त्यात आपली संस्कृती जपली की त्याचे सौंदर्य अधिक वाढते. सोशल मीडियावर सध्या एका प्रेमाच्या अनोख्या प्रपोजलचा व्हिडिओ तुफान चर्चेत आहे. गाझियाबादमधील एका प्रसिद्ध मॉलमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीला केवळ प्रपोजच केले नाही, तर सर्वांसमोर तिच्या भांगामध्ये सिंदूर भरला आणि मंगळसूत्र घातले. रोमान्स आणि परंपरा यांचा हा अनोखा मेळ पाहून उपस्थित नागरिकही भारावून गेले.
गाझियाबादच्या 'गौर सेंट्रल मॉल'मध्ये हा प्रकार घडला. येथील ख्रिसमस निमित्त सजवलेल्या एका भव्य ख्रिसमस ट्री समोर हे जोडपे उभे होते. यावेळी तरुणाने गुडघ्यावर बसून अंगठी काढली आणि आपल्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी विचारले. मुलीने 'हो' म्हणताच तिथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, खरी चर्चा रंगली ती यानंतर घडलेल्या प्रसंगाची.
मुलीने प्रपोज स्वीकारल्यानंतर तरुणाने चक्क खिशातून सिंदूरची डबी काढली आणि सर्वांच्या समोर मुलीच्या डोक्यात सिंदूर भरला. एवढेच नाही तर त्याने तिला मंगळसूत्रही घातले. पाश्चात्य पद्धतीने प्रपोज केल्यानंतर जोडीदाराने जो भारतीय संस्कृतीचा आदर राखला, त्याचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा दिल्या.