Priyanka Gandhi  
राष्ट्रीय

Priyanka Gandhi : तुम्हाला देशातील तरुणांची एवढी का भीती वाटते? : प्रियांका गांधींचा केंद्रावर हल्‍लाबोल

संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत 'आरएसएस'ची घुसखोरी

पुढारी वृत्तसेवा

Priyanka Gandhi Lok Sabha speech : "माजी शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी 'जिंदाबाद'च्या घोषणा देत सोमवारी (दि.२८) संसदेत त्यांचे स्वागत केले. एकीकडे महाराष्ट्रात पेपरफुटीने कंटाळलेली तरुण मुलगी आत्महत्या करते तिचे कुटुंब शोकाकूल आहे, तर दुसरीकडे तुम्ही माजी शिक्षणमंत्र्यांचा सत्कार करत आहात! हा कोणता अहंकार आहे? जिथे लाज वाटायला हवी होती, तिथे उत्सव साजरा केला जातोय," अशा शब्‍दांमध्‍ये काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी संसदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेत 'परीक्षा सुधारणा विधेयका'वरील चर्चेदरम्यान त्या बोलत होत्या.

तुम्हाला देशातील तरुणांची एवढी का भीती वाटते?

"तुम्हाला या देशातील तरुणांची एवढी भीती का वाटते? आणि विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करून त्यांचा आवाज दाबण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?" असे सवाल करत "पंतप्रधानांनी अशा व्यक्तीला शिक्षणमंत्री केले आहे ज्यांनी एका गरोदर महिलेच्या बलात्कार्यांना सोडवण्याचे समर्थन केले होते. या निर्णयाद्वारे देशातील करोडो मुलींना सरकार कोणता संदेश देऊ इच्छिते?", असा टोलाही त्‍यांनी लगावला.

सरकारमुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत: प्रियंका गांधी

"NEET ची परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांची आई दागिने विकत आहे, तर वडील जमीन गहाण ठेवत आहेत. मात्र, सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही मुले आज नैराश्याच्या गर्तेत ढकलली गेली आहेत. या देशात कष्टापेक्षा पैशालाच जास्त महत्त्व आहे, असाच संदेश प्रामाणिक विद्यार्थ्यांना दिला जात आहे," अशी उद्विग्नता प्रियंका गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.

परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळे शेकडो विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले

शिक्षणाचा आणि अभिव्यक्तीचा अधिकार भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिला असल्याचे सांगत प्रियंका गांधी म्हणाल्या, "आजपर्यंत विविध परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळे शेकडो विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले आहे. मात्र, याला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. आज आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत आरएसएसने (RSS) घुसखोरी केली असून सरकारने शिक्षणावरील खर्चातही मोठी कपात केली आहे."

प्रियंका गांधी यांनी मांडला त्‍या विद्यार्थिनीच्या आईचा हृदयद्रावक अनुभव

यावेळी प्रियंका गांधी यांनी पोलिसांच्या लाठीहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दिल्लीतील एका विद्यार्थिनीचा आणि तिच्या आईचा थरारक अन् हृदयद्रावक अनुभव सभागृहात मांडला. त्या म्हणाल्या, "काही दिवसांपूर्वी पोलीस लाठीहल्ल्यात गंभीर जखमी होऊन 'आयसीयू'मध्ये जीवनाशी झुंज देणाऱ्या दिल्लीतील एका विद्यार्थिनीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयात गेलो होतो. आमच्या पोहोचण्याच्या काही वेळ आधीच केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा तिथे जाऊन आले होते, तर त्यांच्या आधीही एक नेते भेट देऊन गेले होते. सतत येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या या फेऱ्यांमुळे त्या मुलीची आई व्यथित झाली होती."

'तुम्ही इथे कशाला आला आहात?'

"आम्ही जेव्हा आयसीयूच्या दाराशी पोहोचलो, तेव्हा त्या मुलीच्या आईने आम्हाला विचारले, 'तुम्ही इथे कशाला आला आहात?' हात जोडून आणि थरथरत्या हातांनी त्या म्हणाल्या, 'तुम्ही आलात त्याबद्दल आभार, पण मला आता कोणालाही भेटायचे नाही आणि कोणाशीही बोलायचे नाही.' त्या आईचे दुःख इतके मोठे होते की त्यांचे संपूर्ण शरीर थरथरत होते. अतिशय वेदनादायी आवाजात त्या म्हणाल्या, 'सकाळपासून मोठे मोठे नेते एकापाठोपाठ एक इथे येत आहेत आणि व्हिडिओ बनवत आहेत. अहो, माझ्या मुलीची ही अवस्था ज्यांच्यामुळे झाली आहे, ते लोकही इथे येऊन गेले... का करताय हे सर्व?'", असा सवालही त्या आईने केल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT