

Nagpur Congress Protest
नागपूर: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, रामटेकचे खासदार शामकुमार बर्वे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ जिल्हा ग्रामीण काँग्रेसने बुधवारी (दि.२२) आक्रमक पवित्रा घेतला.
राजभवन परिसरात भर पावसात आंदोलन चिघळत असल्याने आक्रमक कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. तर दुसरीकडे काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी धडक दिल्याने भाजपनेही आता काँग्रेस विरोधात रस्त्यावर उतरण्याचे ठरविले आहे.
मंगळवारी काँग्रेस खासदार हे विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर पंतप्रधान निवासासमोर आंदोलन करत असताना त्यांना जबरदस्तीने अटक करण्यात आली. या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या मागणीच्या समर्थानार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार हे आंदोलन करण्यात आले.
शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यावर केलेला लाठीचार्ज आणि दडपशाहीच्या विरोधात भर पावसात राजभवन गेटसमोर विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली. नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अश्विन बैस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. काल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडध्ये यांच्या नेतृत्वाखाली राजभवन परिसरात आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आक्रमक कार्यकर्त्यांची धरपकड केली.