काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी आयआयटी मद्रासचे संचालक प्रा. व्ही. कामकोटी यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून वाद चिघळला आहे. File Photo
राष्ट्रीय

Gaumutra Remark Controversy : गौमूत्र वक्तव्य विवाद; आजी-माजीकुलगुरूंसह २१५ शिक्षणतज्ज्ञांचे प्रियांका गांधींना खुले पत्र

वैयक्तिक टिप्पणी आणि उपहासामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनासह प्रगल्भ सार्वजनिक चर्चेला पोहोचते बाधा

पुढारी वृत्तसेवा

Gaumutra remark controversy : परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभेत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी आयआयटी मद्रासचे संचालक प्रा. व्ही. कामकोटी यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून वाद चिघळला आहे. या वक्तव्याचा निषेध करत देशभरातील आजी-माजी कुलगुरूंसह तब्बल २१५ हून अधिक शिक्षणतज्ज्ञांनी प्रियंका गांधी-वड्रा यांना उघडे पत्र (ओपन लेटर) लिहिले आहे. लोकशाहीत असहमतीचे स्वागत असले, तरी वैयक्तिक टिप्पणी आणि उपहासामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रगल्भ सार्वजनिक चर्चेला बाधा पोहोचते, असा आक्षेप या शिक्षणतज्ज्ञांनी नोंदवला आहे.

काय म्‍हणाल्‍या होत्‍या प्रियांका गांधी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या समितीमध्ये 'गौमूत्र तज्ज्ञ' असल्याचा टोला लगावताना प्रियंका गांधी यांनी आयआयटी मद्रासचे संचालक प्रा. व्ही. कामकोटी यांचा "गौमूत्र तज्ज्ञ" असा उल्लेख केला होता. याविरोधात शिक्षणतज्ज्ञ एकवटले आहेत. राजकीय चिखलफेक किंवा उपरोधिक शेरेबाजी ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून, यामुळे लोकशाहीतील तर्कसंगत संवादाची जागा उपहास घेतो, अशी चिंता पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

शैक्षणिक आणि वैज्ञानिक योगदानाचा अनादर

पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांनी प्रा. कामकोटी यांच्या वैज्ञानिक योगदानाचा उल्लेख करण्‍यात आला आहे. प्रा. कामकोटी हे देशातील अव्वल तांत्रिक तज्ज्ञांपैकी एक असून त्यांनी आयआयटी मद्रास येथून संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकीमध्ये एम.एस. व पीएच.डी.ची पदवी संपादित केली आहे. त्यांचे १५० हून अधिक संशोधन निबंध (Research Papers) प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय, भारताच्या पहिल्या व्यावसायिक स्तरावरील मायक्रोप्रोसेसरच्या निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा असून, त्यांना डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) कडून शैक्षणिक उत्कृष्टतेचा पुरस्कारही मिळाला आहे. अशा दिग्गज अभ्यासकाला केवळ एका 'लेबल'खाली हिणवणे म्हणजे त्यांच्या योगदानाचा अवमान करण्यासारखे आहे, असे शिक्षणतज्ज्ञांनी म्हटले आहे.

लेबल लावून डावलणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाला तडे

पत्रात नमूद केले आहे की, एखाद्या विचारांवर मूळ चर्चा करण्याऐवजी त्यांना विशिष्ट 'लेबल' लावून डावलल्यास, राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला अंगीकारण्यास सांगितलेल्या 'वैज्ञानिक दृष्टिकोनाला'च तडे जातात. देशातील वैज्ञानिक, संशोधक आणि शिक्षकांना कोणत्याही अपमानास्पद लेबलच्या भीतीशिवाय सार्वजनिक चर्चेत सहभाग घेण्याचा अधिकार आहे. जेव्हा गुंतागुंतीचे वैज्ञानिक विषय राजकीय उपहासाचे साधन बनतात, तेव्हा समाज एका प्रगल्भ आणि माहितीपूर्ण चर्चेच्या संधीला मुकतो.

वैज्ञानिक दृष्टिकोनावर गदा

एखाद्या अभ्यासकाच्या विचारांशी संवाद साधण्याऐवजी त्यांना हिणवणे हे घटनेतील मूलकर्तव्याच्या विरोधात आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे केवळ अपारंपरिक विचारांकडे संशयाने पाहणे नव्हे, तर कोणत्याही दाव्याची निष्पक्ष तपासणी करणे होय. इतिहासात अनेक संकल्पना सुरुवातीला अशक्य वाटत होत्या, परंतु पुढे त्या विज्ञानाच्या कसोटीवर सत्य सिद्ध झाल्या, याची आठवण पत्रात करून देण्यात आली आहे.

संशोधक वर्गामध्ये चुकीचा संदेश

अशा प्रकारच्या राजकीय टिप्पणीमुळे भारतातील संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रात नकारात्मक संदेश जातो. वैज्ञानिकांनी मांडलेल्या मुद्द्यांवर टीका करा, पुराव्यांना आव्हान द्या, मात्र त्यांच्या विद्वत्तेचा आणि कर्तृत्वाचा अवमान करू नका, असा सल्ला शिक्षणतज्ज्ञांनी दिला आहे. लोकप्रतिनिधींच्या वक्तव्यांचा राष्ट्रीय चर्चेच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होतो. संसदेसारख्या सर्वोच्च गृहात होणाऱ्या चर्चांमध्ये अधिक गांभीर्य आणि मूल्यांची जपणूक व्हावी, अशी अपेक्षा या पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये आयसीटी मुंबईचे (ICT Mumbai) माजी कुलगुरू प्रा. जी. डी. यादव आणि भारतीय विद्यापीठ संघाच्या (AIU) सरचिटणीस प्रा. पंकज मित्तल यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT