Prithviraj Chavan Reacts to Dharmendra Pradhan Resignation: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याला विद्यार्थी चळवळीचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असल्याचे म्हटले आहे. तसेच या घडामोडीमुळे "मोदी सरकारच्या शेवटाची ही सुरुवात आहे," असा दावा त्यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे आणि युवा शक्तीच्या दबावामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला.
ते म्हणाले, "हा विद्यार्थ्यांचा, युवा शक्तीचा आणि लोकशाहीचा मोठा विजय आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात जबाबदारी स्वीकारून एखाद्या केंद्रीय मंत्र्याने दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे."
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. "एका वाक्यात सांगायचे झाले तर 'This is the beginning of the end'. मोदी सरकारचा मनमानी कारभार आता जनता स्वीकारणार नाही. या घटनेतून ते स्पष्ट झाले आहे," असा दावा त्यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते, गेल्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता.
त्यांनी सांगितले की, संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच सरकारने निर्णय घेतला असता तर परिस्थिती वेगळी असती. मात्र सरकारने कोणतीही जबाबदारी स्वीकारली नाही आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा प्रयत्न केला.
"गेल्या 12 वर्षांत सरकारने चूक मान्य करण्याऐवजी हट्टी भूमिका घेतली. मात्र विद्यार्थ्यांच्या आणि युवा शक्तीच्या दबावापुढे अखेर सरकारला झुकावे लागले," असे ते म्हणाले.
चव्हाण यांनी असेही नमूद केले की, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा सादर केल्याची माहिती समोर आली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो अधिकृतपणे स्वीकारला आहे का आणि शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नव्हती.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओचाही उल्लेख केला.
त्यांच्या मते, मध्यरात्री व्हिडिओ प्रसिद्ध करावा लागणे ही सरकारची 'पॅनिक रिअॅक्शन' होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतरच सरकारने टास्क फोर्स, विशेष तपास पथक (SIT) आणि इतर उपाययोजना जाहीर केल्या. हे निर्णय आधी का घेतले नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
चव्हाण यांनी या संपूर्ण घडामोडीला लोकशाहीसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला, असे सांगत त्यांनी या आंदोलनाचे कौतुक केले.