पंतप्रधान नरेंद्र मोदी  File Photo
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर रवाना

क्वाड देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या चौथ्या बैठकीत सहभागी होणार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा - पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या चौथ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. २१ सप्टेंबर रोजी चौथ्या क्वाड शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत आणि न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेच्या एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. भारत पुढील वर्षी क्वाड देशांच्या (चतुर्भुज) राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करणार आहे.

सध्या अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. यादरम्यान क्वाड देशांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. ही बैठक विल्मिंग्टन, डेलावेअर येथे होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा सहभागी होणार आहेत. बैठकीत क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये रशिया- युक्रेन युद्धापासून इस्त्रायल- हमास संघर्षापर्यंत विविध गोष्टींवर चर्चा होणार आहे. याशिवाय, क्वाड देश आरोग्य, नैसर्गिक आपत्तींना प्रतिसाद, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा, पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांवरही चर्चा करणार आहेत.

२०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये क्वाड राष्ट्रप्रमुखांची पहिली बैठक झाली. दरम्यान आतापर्यत क्वाड सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आठ बैठका झाल्या आहेत. पुढील वर्षी २०२५ मध्ये भारतामध्ये राष्ट्राध्यक्षांची बैठक होणार असल्याने अमेरिकेत होणाऱ्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदींची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे. क्वाड राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीला रवाना होण्यापुर्वी पंतप्रधान मोदींनी एक्सवर याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मी क्वाड शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या बैठकीत ‘समिट ऑफ द फ्युचर’ ला संबोधित करण्यासाठी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना होत आहे.

माझे सहकारी राष्ट्राध्यक्ष बायडेन, पंतप्रधान अल्बानीज आणि पंतप्रधान किशिदा यांच्यासोबत क्वाड शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. हिंद- प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी कार्य करण्यासाठी समविचारी देशांचा प्रमुख गट म्हणून हा मंच उदयाला आला आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासोबतची माझी भेट आम्हाला भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारीत जनतेच्या फायद्यासाठी आणि जागतिक कल्याणासाठी अधिक दृढ करण्यासाठी नव्या मार्गांचा आढावा घेण्याची संधी देईल. मी भारतीय समुदायासोबत आणि महत्त्वाच्या अमेरिकन व्यावसायिक नेत्यांसोबत संवाद साधण्यासाठी उत्सुक आहे. ‘समिट ऑफ द फ्युचर’ ही जागतिक समुदायासाठी मानवतेच्या कल्याणाची भविष्यातील वाटचाल निर्धारित करण्याची एक संधी आहे. जागतिक लोकसंख्येचा सहावा भाग असलेल्या आपल्या लोकसंख्येचा शांततामय आणि सुरक्षित भविष्यावर सर्वात जास्त अधिकार असल्याने त्यांच्या वतीने मी विचार मांडणार आहे.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT