नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या चौथ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेला जाणार आहेत. २१ सप्टेंबर रोजी ही बैठक अमेरिकेत होणार आहे. भारत पुढील वर्षी क्वाड देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करणार आहे.
सध्या अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. यादरम्यान क्वाड देशांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ही बैठक विल्मिंग्टन, डेलावेअर येथे होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा सहभागी होणार आहेत. बैठकीत क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये रशिया- युक्रेन युद्धापासून इस्त्रायल- हमास संघर्षापर्यंत विविध गोष्टींवर चर्चा होणार आहे. याशिवाय, क्वाड देश आरोग्य, नैसर्गिक आपत्तींना प्रतिसाद, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा, पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांवरही चर्चा करणार आहेत.
२०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये क्वाड राष्ट्रप्रमुखांची पहिली बैठक झाली. दरम्यान आतापर्यत क्वाड सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आठ बैठका झाल्या आहेत. पुढील वर्षी २०२५ मध्ये भारतामध्ये राष्ट्राध्यक्षांची बैठक होणार असल्याने अमेरिकेत होणाऱ्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदींची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे.