पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली
दिल्लीतील प्रगती मैदानाच्या इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉरचे उद्घाटन आज ( दि. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. विविध विषयांवरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शने आणि मेळ्यांसाठी प्रगती मैदान प्रसिद्ध आहे. सुमारे 920 कोटी खर्चून इंटिग्रेटेड ट्रान्झिट कॉरिडॉरची उभारणी करण्यात आलेली आहे.
जनतेला प्रदर्शन स्थळी कोणत्याही अडथळ्यांशिवाय पोहोचता यावे आणि पार्किंगची समस्या सुटावी, हा कॉरिडॉर उभारणीचा उद्देश आहे. प्रगती मैदान परिसर हा अत्यंत रहदारीचा परिसर म्हणून ओळखला जातो. कॉरिडॉरमुळे रहदारीच्या समस्येवर मात मिळेल, असा दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा विश्वास आहे. कॉरिडॉरचा मुख्य बोगदा रिंग रोडला इंडिया गेटशी जोडल्या जाणाऱ्या रस्त्यावर उघडेल. बोगद्यातच पार्किंगची विस्तृत सोय करण्यात आली आहे. कॉरिडॉर उद्घाटनाच्या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, पियुष गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.