नवी दिल्ली : सीमाशुल्कातून सवलत आणि जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी सरकारने औषध कंपन्यांना तीन कर्करोगविरोधी औषधांच्या किंमती कमी करण्यास सांगितले आहे.
परवडणाऱ्या किंमतीत औषधांची उपलब्धता होण्यासाठी, राष्ट्रीय औषधी किंमत प्राधिकरणाने एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये संबंधित उत्पादकांना तीन कर्करोगविरोधी औषधांवर किंमत कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रॅस्टुझुमॅब, ओसिमरटिनिब आणि दुर्वालुमॅब या तीन औषधांच्या किंमती कमी करण्यास सांगितले आहे.
२०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या तीन कॅन्सर-विरोधी औषधांना सीमाशुल्कातून सूट देण्याच्या घोषणेच्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे रसायन आणि खते मंत्रालयाने सांगितले. महसूल विभाग, वित्त मंत्रालयाने, या वर्षी २३ जुलै रोजी एक अधिसूचना जारी केली. ज्यामध्ये तीन औषधांवरील सीमाशुल्क शून्य केले आहे. "त्यानुसार, बाजारातील या औषधांच्या किंमतीमध्ये कपात केली जावी आणि कमी कर आणि शुल्कांचे फायदे ग्राहकांना दिले जावे," असे मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे प्राधिकरणाने वर नमूद केलेल्या औषधांच्या सर्व उत्पादकांना त्यांची किंमत कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्पादकांनी डीलर्स, राज्य औषध नियंत्रक आणि सरकार यांना किंमत सूची किंवा पूरक किंमत सूची जारी करणे आवश्यक आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. लोकसभेत २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्रॅस्टुझुमाब, ओसिमरटिनिब आणि दुर्वालुमब यांच्यावरील सीमाशुल्क १० टक्क्यांवरून शून्यावर आणण्याचा प्रस्ताव मांडला होता.