नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जुलैमध्ये २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार, पंतप्रधान मुद्रा योजना (पीएमएमवाय) अंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्प्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला. सध्याच्या १० लाख रुपये कर्ज मर्यादेवरून २० लाख रुपये करण्यात आली आहे. यासाठी सरकारने अधिकृत अधिसूचना जारी केली.
केंद्र सरकारने नव उद्योजकांना जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी मुद्रा कर्ज योजनेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, मुद्रा कर्जासाठी ‘तरुण प्लस‘ची नवीन श्रेणी तयार करण्यात आली आहे. त्या श्रेणीअंतर्गत १० लाखांपेक्षा जास्त आणि २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. ज्या उद्योजकांनी तरुण श्रेणी अंतर्गत पूर्वीची कर्जे घेतली आहेत आणि यशस्वीपणे परतफेड केली आहे, त्यांच्यासाठी हे कर्ज उपलब्ध असेल. २० लाखांपर्यंतच्या मुद्रा कर्जाची हमी क्रेडिट गॅरंटी फंड फॉर मायक्रो युनिट्स अंतर्गत प्रदान केले जाईल.
पंतप्रधान मुद्रा योजना ही नॉन-कॉर्पोरेट, बिगर-शेती लघु/सूक्ष्म उद्योगांना कर्ज देण्यासाठी पंतप्रधानांनी ८ एप्रिल २०१५ रोजी सुरू केलेली योजना आहे. याअंतर्गत दिले जाणारे कर्ज मुद्रा कर्ज म्हणून वर्गीकृत आहेत. या योजनेअंतर्गत बँका, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या, सूक्ष्म-वित्त संस्था आणि इतर आर्थिक मध्यस्थांद्वारे कर्ज प्रदान केले जाते. मुद्रा योजनेअंतर्गत बाल, किशोर, तरुण आणि तरुण प्लस अशा श्रेण्यांमध्ये कर्ज उपलब्ध आहे. बाल श्रेणीसाठी ५० हजार, किशोर श्रेणीसाठी ५० हजार ते ५ लाख, तरुण श्रेणीसाठी ५ लाख ते १० लाख रुपयांचे कर्ज मिळते. यामध्ये आता नवीन श्रेणी अर्थात ‘तरुण प्लस’नुसार २० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे.