Guy buys domain for girlfriend
नवी दिल्ली : प्रेम व्यक्त करण्याचे वेगवेगळे प्रकार आपण ऐकून-पाहून आहोत. कुणी गुलाब देतो, कुणी गाणी गातो, तर कुणी कविता लिहितो किंवा आणखी कुणी काहीही यापेक्षा हटके करू शकतो. आताही एक तरूण त्याच्या अनोख्या प्रेमाच्या स्टाईलने इंटरनेटवर हीरो ठरला आहे. त्याच्या जाहीरपणे प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीने नेटकऱ्यांच मन जिंकलं आहे.
अद्वैत नावाच्या या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसाठी असं केलंय जे यापुर्वी कुणालाही सुचलं नसेल. त्याने चक्क prettiestwomanintheworld.com (प्रीटीएस्ट वुमन इन द वर्ल्ड डॉट कॉम) हे डोमेनच खरेदी केले आहे. आणि तशी वेबसाईट तयार करून त्यावर फक्त एकच फोटो टाकला आहे. तो फोटो आहे अद्वैतच्या गर्लफ्रेंड कृथिकाचा!
अद्वैत नावाच्या या मुलाने अलीकडेच X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली, जी सध्या इंटरनेटवर सर्वात गोड आणि निरागस गोष्ट म्हणून व्हायरल झाली आहे. त्याने अगदी सहजपणे सांगितलं की त्याच्याकडे prettiestwomanintheworld.com हे डोमेन आहे, ज्यावर फक्त त्याच्या गर्लफ्रेंडचा एक फोटो आहे.
त्याने लिहिले आहे की, "माझी आवडती गोष्ट म्हणजे लोकांना हे सांगायचं आहे की, माझ्याकडे prettiestwomanintheworld[.]com हे डोमेन आहे. ज्यावर मी माझ्या गर्लफ्रेंडचा फोटो टाकला आहे. तीच खरोखर जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे हे सिद्ध करण्यासाठी.
ही वेबसाईटवर उघडताच कृथिका नावाच्या त्याच्या गर्लफ्रेंडचा एक फोटो दिसतो, आणि त्याखाली एक वाक्य लिहिलं आहे: "ही वेबसाइट हे सिद्ध करण्यासाठी आहे की कृथिका ही खरोखरच जगातली सर्वात सुंदर स्त्री आहे."
अद्वैतची ही प्रेमाची स्टाईल पाहून नेटकरी अक्षरशः त्याच्यावर फिदा झाले आहेत. या डिजिटल युगातही प्रेम इतकं निरागस, सरळसोपं आणि प्रामाणिक असू शकतं याचा हा जिवंत पुरावा आहे, अशा प्रतिक्रिया इंटरनेटवर व्यक्त होत आहेत.
अद्वैत याने "PrettiestWomanInTheWorld.com" हे डोमेन खरेदी करून सिद्ध केलं आहे की, त्याची गर्लफ्रेंडच सर्वात सुंदर आहे
ही गोड आणि विचारपूर्वक केलेली कृती पाहून अऩेकांनी अद्वैतच कौतूक केले आहे. कुणी त्याला "सर्वोत्कृष्ट बॉयफ्रेंड" म्हटलं, तर कुणी म्हटलं आहे की, अद्वैतने आता बॉयफ्रेंडचं स्टँडर्ड इतकं उंचीवर नेलंय की बाकी सगळ्यांना ते गाठणं अशक्य आहे. त्याच्या पोस्टवर तर कौतुकाच्या कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव झाला आहे.
दरम्यान, ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या डोमेनच्या वेबसाईटवर भेट दिली. त्यामुळे अद्वैतने कृतिकाचा फोटो ब्लर केला आहे.
प्रीटीएस्ट वुमन इन द वर्ल्ड अर्थात माझ्या गर्लफ्रेंडचा फोटो पाहण्यासाठी लोकांनी इतका प्रचंड अफाट प्रतिसाद दिलाय की, मी आता तिची इमेज ब्लर केली आहे, असा संदेश त्याने लिहिला आहे.