Premanand Maharaj Ashram Pudhari
राष्ट्रीय

Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांच्या जीवाला धोका; आश्रमात दोन गट पडले, जमीन विकून करोडोंची संपत्ती कमावली, आता सुरक्षेची मागणी

Premanand Maharaj Ashram: वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांच्या सुरक्षेची मागणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे करण्यात आली आहे.

Rahul Shelke

Premanand Maharaj Ashram: वृंदावन येथील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे अध्यक्ष दिनेश शर्मा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून प्रेमानंद महाराजांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. आश्रमाशी संबंधित काही गंभीर आरोपही त्यांनी केले आहेत.

दिनेश शर्मा यांच्या दाव्यानुसार, प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात दोन गट तयार झाले आहेत. यातील एका गटात खरे साधू-संत असल्याचे, तर दुसऱ्या गटात भू-माफिया आणि इतर गैरप्रकारांशी संबंधित लोक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या गटामुळे प्रेमानंद महाराजांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

शर्मा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करून महाराजांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आश्रमाशी संबंधित सुमारे 15 लहान-मोठ्या आश्रमांवर काही लोकांनी कब्जा केल्याचा आरोप आहे. तसेच यमुना खादरातील जमीन विकून मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांची संपत्ती जमा केल्याचाही त्यांनी दावा केला आहे.

आश्रमातील साधकाच्या मृत्यूनंतर प्रश्न उपस्थित

या प्रकरणाला आणखी गंभीर वळण 25 सप्टेंबर 2026 रोजी लागलं. प्रेमानंद महाराजांशी संबंधित 25 वर्षीय साधक दीपक लोधी उर्फ रसिक दुलारी शरण यांचा आश्रमातील चौथ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. शवविच्छेदन अहवालात शरीरावर गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले. शरीरावरील इतर जखमा आणि खासगी अवयवाला झालेल्या दुखापतीबाबतही चर्चा होत आहे. पोलिसांकडून मृत्यूचा तपास सुरु आहे.

काही साधू-संत आणि मृताच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची निष्पक्ष किंवा उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या मृत्यूचे नेमके कारण काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुलगा बेपत्ता झाल्यानेही चर्चेला उधाण

दरम्यान, आश्रमाशी संबंधित एक मुलगा बेपत्ता होण्याचे प्रकरणही समोर आले होते. कुटुंबीयांनी आश्रमाबाहेर आंदोलन करत मुलगा दीक्षा घेतल्यानंतर बेपत्ता झाल्याचा आरोप केला होता.

मात्र, 16 वर्षीय मुलाला बरसाना पोलिसांनी शनिवारी राधाबाग मार्गावरील लाडली दास आश्रमातून सुखरूप शोधून काढले. त्यानंतर पोलिसांनी त्याला आंदोलन करणाऱ्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

याशिवाय नोएडातील 35 वर्षीय महिला 15 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याचेही प्रकरण समोर आले आहे. ती प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेली असावी, अशी कुटुंबीयांची शक्यता आहे. मात्र, ती महिला आश्रमात गेली होती किंवा सध्या तिथे आहे, याची अद्याप अधिकृत माहिती नाही.

सुरक्षेची मागणी

प्रेमानंद महाराजांचे मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे दिनेश शर्मा यांनी म्हटले आहे. आश्रमातील गटबाजी, साधकाच्या मृत्यूचे प्रकरण आणि इतर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT