Prateek Yadav passes away file photo
राष्ट्रीय

Prateek Yadav passes away: अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यांचे निधन; वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायम सिंह यादव यांचे पुत्र, अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचे आज सकाळी लखनौ येथे निधन झाले.

मोहन कारंडे

Prateek Yadav passes away

लखनौ: समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायम सिंह यादव यांचे पुत्र, अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचे आज सकाळी लखनौ येथे निधन झाले. ते ३८ वर्षांचे होते. प्रतीक यांना पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास 'सिव्हिल हॉस्पिटल'मध्ये आणण्यात आले होते; मात्र डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रतीक यादव हे मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे चिरंजीव होते. उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबाशी संबंधित असूनही प्रतीक यांनी सक्रिय राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले होते. त्यांनी ब्रिटनमधील प्रतिष्ठित 'युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स'मधून शिक्षण पूर्ण केले होते. लखनौमध्ये ते 'द फिटनेस प्लॅनेट' नावाची जिम चालवत असत. त्यांना शरीरसौष्ठव आणि व्यायामाची प्रचंड आवड होती.

अपर्णा यादव यांच्याशी विवाह आणि कौटुंबिक वाद

प्रतीक यादव यांचा विवाह २०११ मध्ये अपर्णा यादव यांच्याशी सैफई या त्यांच्या मूळ गावी मोठ्या थाटामाटात झाला होता. अपर्णा यादव सध्या भाजपमध्ये सक्रिय असून उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक आणि अपर्णा यांच्यातील वैयक्तिक संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या. स्वतः प्रतीक यादव यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे पत्नीवर गंभीर आरोप केले होते. कौटुंबिक संबंध बिघडल्याचे सांगत त्यांनी घटस्फोट घेण्याची इच्छाही व्यक्त केली होती, ज्यामुळे ते चर्चेत आले होते.

समाजवादी पक्षाकडून श्रद्धांजली

प्रतीक यादव यांच्या निधनावर समाजवादी पक्षाने 'एक्स' हँडलवरून शोक व्यक्त केला आहे. "प्रतीक यादव यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो," अशा शब्दांत पक्षाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT