Prashant Kishor Pudhari
राष्ट्रीय

Prashant Kishor : "तुमचे बायोडाटा पाठवा..." : निवडणूक जिंकताच प्रशांत किशोरांचे १०,००० तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन

देशभरातील कॉर्पोरेट क्षेत्रातील संपर्काचा वापर करून पात्र तरुणांना खाजगी क्षेत्रात रोजगार मिळवून देणार

पुढारी वृत्तसेवा

Prashant Kishor Bankipur job promise : बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा (BJP) तब्बल ३० वर्षांचा गड उद्ध्वस्त केल्यानंतर जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी मतदारसंघासाठी मोठी घोषणा केली आहे. येत्या एक ते दोन वर्षांत बांकीपूरमधील किमान १०,००० सुशिक्षित बेरोजगार तरुणांना खाजगी क्षेत्रात नोकऱ्या मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून, यासाठी स्थानिकांना आपल्या मुलांचे बायोडाटा (CV) कार्यालयात जमा करण्याचे आवाहन केले आहे.

प्रशांत किशोरांनी मिळवला ऐतिहासिक विजय

३ ऑगस्ट रोजी झालेल्या पोटनिवडणुकीतील विजयानंतर प्रशांत किशोर यांनी मंगळवारी पहिल्यांदाच बांकीपूरचा दौरा करून मतदारांचे आभार मानले. या वेळी बोलताना ते म्हणाले, "देशभरातील कॉर्पोरेट क्षेत्रातील माझ्या संपर्काचा वापर करून मी पात्र तरुणांना खाजगी क्षेत्रात रोजगार मिळवून देईन." मात्र, ही सरकारी नोकरी नसेल आणि सुरुवातीच्या टप्प्यात तरुणांना बिहारबाहेरही जावे लागू शकते, हे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात जन सुराज पक्षाचे सरकार आल्यास बिहारमध्येच रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील, असा दावाही त्यांनी केला.

भाजपचा ३० वर्षांचा बालेकिल्ला ढासळला

बांकीपूरच्या हाय-व्होल्टेज पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा १९,३२४ मतांनी पराभव करत जन सुराज पक्षाला पहिला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. किशोर यांना ६४,१५१ मते मिळाली, तर भाजप उमेदवाराला ४४,८२७ मते मिळाली. राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) रेखा गुप्ता १४,२७३ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

काय आहेत प्रशांत किशोर यांच्या प्राधान्यक्रमातील गोष्टी?

केवळ आमदार झाल्याने बांकीपूरचे रातोरात 'बंगळुरू' होणार नाही, मात्र पुढील २ ते ३ महिनंत सकारात्मक बदल दिसू लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नोकऱ्यांशिवाय शिक्षण सुधारणे, ११०० रुपये मासिक पेन्शन आणि अन्नधान्य पुरवठा ही आपली मुख्य चार प्राधान्ये असल्याचे त्यांनी म्‍हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT