Porn app cyber alert
नवी दिल्ली: एका पॉर्न ॲपच्या जाहिरातीवर केलेला एक क्लिक सायबर गुन्हेगारांना मोबाईल फोनवर ताबा मिळवण्यासाठी, ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि अगदी अनधिकृत बँकिंग व्यवहार करण्यासाठीही पुरेसा ठरू शकतो, असा इशारा गृह मंत्रालयाच्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने दिला आहे.
गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील जाहिरातींद्वारे पॉर्न कंटेंटचे आमिष दाखवून मालवेअर असलेले ॲप्स पसरवले जात आहेत. युझर्सना अधिकृत ॲप स्टोअरऐवजी बाहेरून थेट एपीके फाईल्स डाऊनलोड करण्यास प्रवृत्त केले जात आहे, ज्यामुळे नकळतपणे सायबर गुन्हेगारांसाठी मार्ग मोकळा होत आहे.
या सूचनेमध्ये मुख्यत्वे नाईट प्ले (Night Play), रिलूप (Reloop), किस (Kyss), विमो (Vimo), रिवो (Rivo), नेक्सो (Nexo) आणि व्हिक्सा अशा नावांच्या ॲप्सबाबत विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. पॉर्न कंटेंट पुरवण्याच्या बहाण्याने हे ॲप्स डाऊनलोड करून घेतले जातात, परंतु प्रत्यक्षात त्यामध्ये संपूर्ण डिव्हाइस हॅक करण्याची क्षमता असणारे मालवेअर दडलेले असतात.
ॲप डाऊनलोड केल्यानंतर युझरने त्या ॲपला 'ॲक्सेसिबिलिटी परमिशन' दिली की सर्वात मोठा धोका निर्माण होतो. एकदा का ही परवानगी मिळाली की, हा मालवेअर मोबाईलमध्ये बॅकग्राउंडला शांतपणे काम करू लागतो. यामुळे हॅकर्स युझरच्या नकळत त्याच्या मोबाईलमधील महत्त्वाच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवू शकतात.
हे मालवेअर मोबाईलमध्ये आपोआप व्हीपीएन सेवा इन्स्टॉल करू शकतात. यामुळे युझरचा संपूर्ण इंटरनेट डेटा हॅकर्सच्या सर्व्हरद्वारे वळवला जातो, ज्यातून खासगी माहिती आणि ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे होते. एवढेच नाही तर, मोबाईलचा पूर्ण ताबा मिळाल्यामुळे युझरच्या डिजिटल वॉलेट आणि बँक खात्यांमधून अनधिकृतपणे आर्थिक व्यवहार करून पैसे काढले जाऊ शकतात.
गूगल प्ले स्टोअर किंवा अधिकृत ॲप स्टोअरव्यतिरिक्त इतर कोणत्याही अज्ञात ठिकाणाहून एपीके फाईल्स डाऊनलोड करू नका.
सोशल मीडियावर येणाऱ्या संशयास्पद जाहिराती आणि लिंक्सवर क्लिक करणे टाळा.
कोणत्याही अज्ञात किंवा अविश्वासू ॲपला 'ॲक्सेसिबिलिटी परमिशन' देऊ नका.
आपल्या मोबाईलमध्ये कोणतीही संशयास्पद प्रणाली कार्यरत नाही ना, याची वेळोवेळी खात्री करा.
अशा प्रकारच्या सायबर फ्रॉडचा संशय आल्यास किंवा फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवावी.