पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीदरम्यान (Delhi Election 2025) दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. यादरम्यान, पोलिसांनी आपचे (AAP) खासदार संजय सिंह आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांच्यासह काही नेत्यांना पोलिसांनी ६ फ्लॅग स्टाफ मार्गावरील मुख्यमंत्री निवासस्थानात जाण्यापासून रोखल्याने बुधवारी गोंधळ निर्माण झाला. यावेळी आप नेते आणि दिल्ली पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच दोन्ही नेत्यांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.
आज संजय सिंह आणि भारद्वाज आणि इतर आप नेते मुख्यमंत्री निवासस्थानी जाण्यासाठी निघाले. त्यांच्यासोबत प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीही होते. याचदरम्यान दिल्ली हाऊस बाहेर पोलिसांनी त्यांना रोखले. यामुळे आम आदमी पक्षाचे नेते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. सीएम हाऊसमध्ये लक्झरी सुविधा असल्याचा दावा भाजपने केला आहे. इथे जर लक्झरी सुविधा असतील तर त्या उघडपणे दाखवल्या पाहिजेत. त्या सुविधा पाहण्यासाठी आलो आहोत, असे सांगत आज आपचे नेते त्यांच्यासोबत प्रसारमाध्यमांना घेऊन पोहोचले होते.
खासदार संजय सिंह म्हणाले की, आम्हाला आत जाण्यासाठी परवानगीची गरज नको. आम्हाला विनाकारण रोखले जात आहे. पोलिसांनी रोखल्यानंतर आप नेत्यांनी धरणे आंदोलन केले. आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी सांगितले की, आम्हाला भाजप नेत्यांना सीएम हाऊस कसे आहे हे दाखवायचे आहे. आम्ही पीएम हाऊसमध्येही जाऊ आणि तेथील सुविधाही पाहू. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात जाण्यापासून मंत्री आणि खासदारांना परवानगीची काय गरज?, असा सवालही भारद्वाज यांनी केला.
आप नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले
त्यानंतर संजय सिंह, सौरभ भारद्वाज पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. मुख्यमंत्री निवासस्थानी प्रवेश नाकारल्यानंतर सौरभ भारद्वाज म्हणाले की, "आम्ही 'तेरा घर, मेरा घर' वाद संपुष्टात आणण्यासाठी येथे आलो होतो. आमचे म्हणचे आहे की पंतप्रधान निवास आणि मुख्यमंत्री निवासस्थान दोन्हीही लोकांना दाखवावे. यासाठी आम्ही येथे आलो आहोत."
दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्री निवासस्थानाचा एक व्हिडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ सीएम हाऊसमधील असल्याचा भाजपचा दावा आहे. भाजप म्हटले आहे की, तुम्ही अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराचा 'शीशमहल' पाहिला का? तुम्ही पाहिला नसेल तर आज शीशमहलच्या आतील दुर्मिळ दृश्ये आज आम्ही तुम्हाला दाखवू.
दरम्यान, याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ गृहमंत्री अमित शाह यांनीही केजरीवाल यांच्यावर ‘शीशमहल’वरुन टीका केली होती. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या जवळपास १० वर्षांच्या कार्यकाळात राजधानीत पायाभूत सुविधा निर्माण करण्याऐवजी स्वत:साठी "शीश महाल" बांधला. याचा हिशोब दिल्लीच्या जनतेला केजरीवालांना द्यावा लागेल, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.