Jyoti Malhotra Case : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्राची वैयक्तिक डायरी पोलिसांनी जप्त केली आहे. यामध्ये तिने पाकिस्तानला केलेल्या प्रवासाच्या तपशीलाची नोंद आहे. ही डायरी तपासात मोठ्या प्रमाणात मदत करू शकते. यामध्ये अनेक संशयित नोंद असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला १६ मे रोजी हिसारमधील न्यू अग्रसेन एक्स्टेंशन येथून अटक करण्यात आली होती. पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्या ११ जणांपैकी ज्योती एक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवासात आपली डायरी बरोबर ठेवत असे आणि इंग्रजी तसेच हिंदीत आपल्या अनुभवांची नोंद करत असे. पोलिसांचा विश्वास आहे की ही डायरी तिच्या आंतरराष्ट्रीय संपर्कांबाबत व संशयास्पद हालचालींबाबत महत्त्वपूर्ण माहिती देऊ शकते.
ज्योती मल्होत्राने दोनदा पाकिस्तानला भेट दिली होती. २०२४ मध्ये जेव्हा ज्योती १० दिवसांसाठी पाकिस्तानला गेली होती, तेव्हा भारतात परतल्यानंतर तिने वैयक्तिक डायरीत सुमारे १०-११ पाने लिहिली असून, त्यात आठ पानांवर इंग्रजीत प्रवासाचे सामान्य निरीक्षण आणि तीन पानांवर पाकिस्तानविषयी हिंदीत लिहिले आहे. त्यात पाकिस्तानवर स्तुतीसुमने उधळली आहेत. यासोबतच भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांबद्दलही मते लिहिली गेली आहेत. ज्योतीने डायरीत लिहिले आहे की, "माझी १० दिवसांची पाकिस्तान भेट पूर्ण केल्यानंतर, आज मी भारतात परतली आहे. सीमांमधील अंतर किती काळ राहील हे आम्हाला माहित नाही, परंतु हृदयातील तक्रारी पुसून टाका. आपण सर्व एकाच भूमीचे, एकाच मातीचे आहोत." त्यांनी पुढे लिहिले की लाहोरला भेट देण्यासाठी दोन दिवस खूप कमी वेळ होता.
पोलीस तिच्या काश्मीर प्रवासाच्या व्हिडिओ क्लिप्स विशेष लक्षपूर्वक तपासत आहेत. या व्हिडिओमध्ये ती ओडिशाच्या पुरीतील प्रियांका सेतुपतीसोबत अनेकदा दिसत आहे. तपास संस्थांनी प्रियांकाचीही सखोल चौकशी केली आहे. मल्होत्रा अनेकदा रात्री १ वाजेपर्यंत व्हिडिओ एडिटिंग व अपलोड करत असे. तसेच कुटुंबाला दिल्लीला जाणार असल्याचे सांगून तिने अन्य ठिकाणी प्रवास केल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
सध्या ज्योती मल्होत्रा पाच दिवसांच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत आहे. एनआयए, गुप्तचर विभाग आणि हरियाणा पोलिसांची संयुक्त टीम तिची चौकशी करत आहे. ती पाकिस्तान, चीन व इतर देशांना भेट देऊन आली आहे. तिचे आर्थिक व्यवहार आणि तिने पदेशात केलेल्या प्रवासाच्या तपशील तपासाला जात आहे. तिच्या वैयक्तिक डायरीमधून तिच्या हेतूंचा, संपर्कांचा आणि हेरगिरीच्या संभाव्य प्रमाणाचा खुलासा होऊ शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे.
रविवार, १८ मे रोजी हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सवान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्रा दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात नियुक्त एका अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. मल्होत्राला थेट लष्करी गोष्टींची माहिती नसली तरी ती पाकिस्तानी गुप्तचर एजंट्स संपर्कात होती. आम्ही सोशल मीडियावर प्रभाव असलेल्या लोकांना गुप्तचर एजंट्स कसे संपर्क करतात हे उघड केले आहे," असेही त्यांनी म्हटलं होतं. मल्होत्रा फाहलगाम हल्ल्यापूर्वी काश्मीरला गेली होती आणि त्याआधी पाकिस्तानलाही गेली होती, हे लक्षात घेऊन तिच्या प्रवासांमधील संबंध शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ज्योती मल्होत्राच्या यूट्यूब चॅनलला ४ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. २०२३ मध्ये तिने पाकिस्तानच्या व्हिसासाठी अर्ज करताना पाकिस्तान उच्चायुक्तालयात एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी संपर्क साधला होता. याच दानिशला १३ मे रोजी भारताने हेरगिरीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली देशातून हद्दपार केले होते.