PM Kisan Yojana file photo
राष्ट्रीय

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता आज जमा होणार; खात्यात पैसे आले का? या सोप्या पद्धतीने तपासा

PM Kisan Samman Nidhi 22nd installment: शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुवाहाटी येथून 'पंतप्रधान किसान सम्मान निधि' (PM-KISAN) योजनेचा २२ वा हप्ता जारी करणार आहेत.

मोहन कारंडे

नवी दिल्ली: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममधील गुवाहाटी येथून 'पंतप्रधान किसान सम्मान निधि' (PM-KISAN) योजनेचा २२ वा हप्ता जारी करणार आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

थेट बँक खात्यात १८,६४० कोटी जमा होणार

या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान मोदी सुमारे ९ कोटी ३२ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'थेट लाभ हस्तांतरण' (DBT) द्वारे १८ हजार ६४० कोटी रुपये जमा करणार आहेत. चौहान म्हणाले की, "आतापर्यंत या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ४ लाख ९ हजार कोटी रुपयांहून अधिक निधी देण्यात आला आहे. आजचा हप्ता जमा झाल्यानंतर ही एकूण रक्कम ४ लाख २७ हजार कोटी रुपयांच्या पुढे जाईल."

कृषी उत्पादनात विक्रमी वाढ

केंद्रीय मंत्र्यांनी गेल्या दशकातील कृषी क्षेत्रातील प्रगतीची आकडेवारीही सादर केली. २०१४ मध्ये २५२ दशलक्ष टन असलेले उत्पादन २०२५ मध्ये वाढून ३५७ दशलक्ष टन झाले आहे. फलोत्पादन क्षेत्रातही मोठी झेप घेतली असून, उत्पादन २७७ दशलक्ष टनांवरून ३६९ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे. फळे आणि भाजीपाला यांच्या उत्पादकतेत सातत्याने वाढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हप्ता जमा झाला का, कसे चेक करावे?

  • जर तुम्ही 'पीएम किसान' योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमचा हप्ता जमा झाला का तपासू शकता.

  • यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: pmkisan.gov.in

  • संकेतस्थळावर, 'Know Your Status' (तुमची स्थिती जाणून घ्या) या पर्यायावर क्लिक करा.

  • तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करा, CAPTCHA भरा आणि तुमच्या मोबाईल फोनवर प्राप्त झालेल्या OTP द्वारे पडताळणी करा.

  • यामुळे तुमचा हप्ता जमा झाला की नाही हे तुम्हाला समजेल.

PM किसान योजनेचे पैसे कसे काढायचे?

एकदा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला की, तो काढण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. तुम्ही ही रक्कम थेट तुमच्या बँकेतून काढू शकता. जर तुमची बँक दूर अंतरावर असेल किंवा तुम्हाला काही अडचणी येत असतील, तर तुम्ही जवळच्या 'सामान्य सेवा केंद्रा'ची (CSC), 'रास्त भाव दुकाना'ची (FPS), 'बचत गटा'ची (SHG) किंवा 'शेतकरी उत्पादक संस्थे'ची (FPO) मदत घेऊ शकता. तसेच, तुम्ही 'DigiPay' किंवा 'DigiPay Lite' ॲप्सचाही वापर करू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT