PM Narendra Modi
नवी दिल्ली : राष्ट्र उभारणीत युवकांचे सक्रिय योगदान असेल तर, देशाचा वेगाने विकास होतो आणि त्या देशाला जागतिक स्तरावर ओळख मिळते. आज भारताची महिला शक्ती नोकरीपासून ते अवकाश आणि विज्ञानापर्यंत विविध क्षेत्रात नवीन उंची गाठत असून, सरकारचा ग्रामीण महिलांना सक्षम बनवण्यावरही भर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. शनिवारी रोजगार मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध विभागांमध्ये नवनियुक्त ५१ हजारपेक्षा अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचे वितरण आज करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आज भारतातील तरूण समर्पण आणि नवोन्मेषाद्वारे आपल्या अफाट क्षमतांचे प्रदर्शन जगासमोर करीत आहेत. 'मेक इन इंडिया' उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतातील तरुणांना जागतिक स्तरावर प्रमाणित उत्पादने तयार करण्याची संधी प्रदान करण्यासाठी अर्थसंकल्पात, उत्पादन अभियानाची घोषणा सरकारने केली आहे.
हे उत्पादन अभियान देशभरातील लाखो एमएसएमई आणि लघु उद्योजकांनाच नव्हे तर देशभरात नवीन रोजगाराच्या संधी देखील निर्माण करेल, असेही पंतप्रधान म्हणाले. यावेळी बोलताना मुबंईत आयोजित जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) देशातील तरुणांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आली आहे. पहिल्यांदाच तरुणांना असे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. माध्यम, गेमिंग आणि मनोरंजन क्षेत्रातील येणाऱ्या लोकांना त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्याची अभूतपूर्व संधी ‘वेव्हज’मुळे मिळेल, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, आज भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये या तरुणांच्या कारकिर्दीतील नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात होते आहे. देशाची आर्थिक चौकट मजबूत करणे, अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे, आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये योगदान देणे आणि परिवर्तनकारी बदल घडवणे, अशी आवश्यक कर्तव्ये पार पाडण्याचे का या तरुणांना करावयाचे आहे, हे सर्व तरुण ज्या प्रामाणिकतेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतील त्याचा भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासावर सकारात्मक परिणाम होईल.
नव्याने नोकरीवर रूजू होणारे तरुण अत्यंत समर्पित भावनेने त्यांची कर्तव्ये पार पाडतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. कुशल भारत, स्टार्टअप इंडिया आणि डिजिटल इंडिया सारख्या उपक्रमांमुळे तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत.
या मोहिमांद्वारे, सरकार भारतातील तरुणांना त्यांची प्रतिभा जगाला दाखवण्यासाठी एक खुले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. या प्रयत्नांमुळे या दशकात, भारतातील तरुणांनी तंत्रज्ञान, माहिती आणि नवनिर्मितीच्या क्षेत्रात देशाला आघाडीवर नेले आहे. भारत आता रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांमध्ये जगात आघाडीवर आहे आणि या यशाचे मोठे श्रेय तरुणांना जाते, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी अलीकडेच आलेल्या आलेल्या यूपीएससी निकालाचा हवाला देत भारतातील मुली विविध क्षेत्रात आघाडीवर असल्याचे म्हटले. पहिल्या ५ टॉपर्सपैकी ३ महिला आहेत. नोकरदार क्षेत्र ते अवकाश आणि विज्ञान अशा सर्व क्षेत्रात महिला नवीन उंची गाठत आहेत. सरकार स्वयं-सहायता गट, विमा सखी, बँक सखी आणि कृषी सखी यासारख्या उपक्रमांद्वारे ग्रामीण महिलांना सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, ज्यामुळे नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. हजारो महिला आता ड्रोन दीदी म्हणून काम करत आहेत.
देशात ९० लाखांहून अधिक बचत गट सक्रिय आहेत. यामध्ये १० कोटींहून अधिक महिलांचा समावेश आहे. या गटांना बळकटी देण्यासाठी सरकारने त्यांचे बजेट पाच पटीने वाढवले आहे. मुद्रा योजनेच्या सर्वात मोठ्या लाभार्थी महिला असून देशातील ५० हजारहून अधिक स्टार्टअप्समध्ये महिला संचालक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी 'एक पेड माँ के नाम' या उपक्रमाबद्दल सांगत निसर्गाप्रती कृतज्ञता आणि सेवेचा संदेश म्हणून प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे, नवनियुक्त तरूणांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी या मोहिमेत अधिकाधिक लोकांना सहभागी करून घ्या, १४० कोटी भारतीयांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करा, असे आवाहन केले. जूनमध्ये येणारा आंतरराष्ट्रीय योग दिन हा यशस्वी कारकिर्दीसोबतच निरोगी जीवन सुरू करण्याची एक उत्तम संधी आहे हे लक्षात आणून देऊन त्यांनी आरोग्य हे केवळ व्यक्तींसाठी आवश्यक नाही तर कार्यक्षमतेसाठी आणि देशाच्या उत्पादकतेसाठी देखील महत्त्वाचे आहे यावरही भर दिला.
नागरी सेवा दिनानिमित्त सांगितलेल्या 'नागरिक देवो भव' या मंत्राचे स्मरण करून आणि नागरिकांची सेवा करणे हे आपल्या इष्ट देवतेच्या पूजेसारखे आहे यावर भर देऊन, प्रामाणिकतेने आणि समर्पणाने भारत एक विकसित आणि समृद्ध राष्ट्र बनेल, असा विश्वासही शेवटी त्यांनी व्यक्त केला.