NDA Parliamentary Party Meeting
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (NDA) सर्व घटकपक्षांची बैठक आज मंगळवारी (दि. ५ ऑगस्ट) संसद भवनमध्ये सुरु आहे. या बैठकीत ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यशस्वीपणे राबविल्याबद्दल एनडीए खासदारांनी एकमताने ठराव मंजूर केला. यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल एनडीए खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रति संवेदनाही व्यक्त करण्यात आल्या. यावेळी नवीन खासदारांची पंतप्रधानांशी ओळखही करून देण्यात आली.
पीएम मोदी एनडीए बैठकीत पोहोचल्यानंतर खासदारांनी 'हर हर महादेव' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पुष्पहार घालून पीएम मोदी यांचे स्वागत केले.
सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतरची एनडीएची ही दुसरी बैठक आहे. या बैठकीत पीएम मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सहभागी झाले आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू, प्रल्हाद जोशी आणि खासदार कंगना रनौत देखील उपस्थित आहेत.
एनडीएची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. कारण उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला २१ ऑगस्टपर्यंत त्यांच्या उमेदवाराची घोषणा करायची आहे. जी या पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशनाचे कामकाज त्याच दिवशी संपणार आहे. जर विरोधी पक्षाकडून उमेदवार देण्यात आला तर निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे एनडीएची बैठक संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान होत आहे. निवडणूक आयोगाच्या बिहारमधील मतदार यादीच्या विशेष सखोल आढाव्याच्या (SIR) पार्श्वभूमीवर विरोधकाकडून जोरदार विरोध सुरु आहे.