राष्ट्रीय

PM Modi-Putin Friendship: मोदींची पुतिन यांना खास भेट! १३३० दोह्यांचा 'तिरुक्कुरल' ग्रंथ सुपूर्द, काय आहे रशियाशी ऐतिहासिक नाते?

BRICS Summit 2026 : भारत-रशिया मैत्रीला सांस्कृतिक जोड देण्यासाठी मोदींची विशेष भेट!

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : नवी दिल्लीत आयोजित १८ व्या 'ब्रिक्स' शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना तमिळ साहित्यातील जगप्रसिद्ध अभिजात ग्रंथ 'तिरुक्कुरल'चा रशियन अनुवाद सप्रेम भेट दिला. महान तमिळ कवी आणि तत्त्वज्ञ संत तिरुवल्लुवर यांनी रचलेला हा ग्रंथ मानवी जीवन, नीतिमत्ता आणि प्रशासकीय व्यवस्था यांच्याशी संबंधित ज्ञानाचा अनमोल ठेवा मानला जातो. ही साहित्यकृती भेट देताना पंतप्रधान मोदींनी आशा व्यक्त केली की, हा ग्रंथ रशियातील वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि दोन्ही देशांतील लोकांचे परस्पर संबंध आणखी दृढ करण्यास मदत करेल. 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ'तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या ग्रंथाचे रशियन अनुवाद नायरा म्क्रतचियन यांनी केले आहे.

संत तिरुवल्लुवर यांच्या 'तिरुक्कुरल' या महाग्रंथामध्ये १३३ अध्यायांत एकूण १,३३० दोहे गुंफलेले आहेत. याचे मूळ तत्त्वज्ञान धर्म (अरम), अर्थ (पोरुल) आणि काम (इन्बम) या तीन प्रमुख घटकांवर आधारित आहे. ग्रंथाच्या सुरुवातीच्या ३८ अध्यायांत सदाचार, कर्तव्य, गृहस्थ जीवन आणि योग्य आचरणाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यानंतरच्या ३९ ते १०८ या अध्यायांमध्ये समाज, अर्थकारण, राजकारण, शासन व्यवस्था आणि कुशल प्रशासनाचे नियम स्पष्ट केले आहेत; तर अंतिम २५ अध्यायांमध्ये प्रेम, आपुलकी आणि मानवी नातेसंबंधांचा सखोल उहापोह करण्यात आला आहे. इसवी सन पूर्व ३०० ते इसवी सन ५०० या काळात रचला गेलेला हा ग्रंथ अभिजात तमिळ साहित्यातील अत्यंत प्रभावशाली मानला जातो. यातील नैतिकता, राज्यकारभार आणि मानवी मूल्यांवरील सार्वभौमिक विचारांमुळेच तमिळनाडूची सीमा ओलांडून या ग्रंथाचे रशियनसह अनेक जागतिक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

या ग्रंथाचे रशियाशी असलेले नाते अत्यंत रंजक आणि ऐतिहासिक आहे. भारतीय तत्त्वज्ञान आणि साहित्याबद्दल रशियामध्ये १७ व्या शतकापासून उत्सुकता राहिलेली आहे. नंतरच्या काळात युरोपीय भाषांमधील अनुवादांच्या माध्यमातून 'तिरुक्कुरल'ने रशियन अभ्यासक आणि विचारवंतांचे लक्ष वेधून घेतले. रशियाचे प्रख्यात लेखक लिओ टॉल्स्टॉय यांनी १९ व्या शतकात या ग्रंथाचा अभ्यास केला होता, असे मानले जाते. या ग्रंथातील सदाचार, करुणा आणि अहिंसेच्या तत्त्वांचा प्रभाव टॉल्स्टॉय यांच्या वैचारिक लेखनावरही स्पष्टपणे दिसून येतो.

इतकेच नव्हे, तर विसाव्या शतकाच्या प्रारंभी लिओ टॉल्स्टॉय आणि महात्मा गांधी यांच्यात झालेल्या ऐतिहासिक पत्रव्यवहारादरम्यान टॉल्स्टॉय यांनी गांधीजींना 'तिरुक्कुरल' वाचण्याचा सल्ला दिला होता, असेही काही संदर्भांतून समोर येते. या ग्रंथातील मानवतावादी तत्त्वज्ञानाने महात्मा गांधींच्या अहिंसेच्या संकल्पनेला वैचारिक बळ दिले होते. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना याच महान ग्रंथाची रशियन प्रत भेट देऊन पंतप्रधान मोदींनी भारत आणि रशियामधील जुने वैचारिक व साहित्यिक अनुबंध आधुनिक राजनैतिक संबंधांशी जोडण्याचा एक दूरगामी प्रयत्न केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT