पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे सलग दहा वर्षे पंतप्रधानपद भूषविणारे, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, भारतातील आर्थिक क्रांतीचे जनक आणि अजातशत्रू राहिलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh death) यांचे गुरुवारी रात्री दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. पीएम मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या.
काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांच्यावर आज शनिवारीच अंत्यसंस्कार होतील. स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमध्ये प्रोफेसर असलेली डॉ. सिंग यांची लहान मुलगी आज सायंकाळपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. आज अंत्यसंस्काराची वेळ जाहीर केली जाईल, असे संकेत काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी दिले आहेत. एएनआयशी बोलताना काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी सांगितले की, डॉ. मनमोहन सिंग यांची मुलगी आज सायंकाळी आल्यानंतर अंत्यसंस्काराची वेळ निश्चित केली जाईल.
माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ, जेष्ठ राजकारणी डॉ. मनमोहन सिंग यांचे दिल्ली येथे निधन झाले. त्यानंतर भारत सरकारच्या वतीने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच सरकारद्वारे आयोजित सर्व कार्यक्रम ७ दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय कॅबिनेट मंडळाची बैठक शुक्रवारी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
हृदयाशी संबंधित आजारामुळे मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. फुफ्फुसात संसर्ग झाल्यानेत्यांना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास एम्स रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी जीवनरक्षक प्रणालीला प्रतिसाद देणे बंद केले आणि गुरुवारी रात्री ९.५१ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली आहेत. त्यांच्या निधनाने जागतिक कीर्तीचा अर्थतज्ज्ञ आणि भारतीय अर्थक्रांतीचा जनक देशाने गमावला आहे, अशा शब्दांत देशभरातील मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सलग दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषविले. अर्थशास्त्राचे प्राध्यापक, भारतीय रिझर्व्ह बँकेच गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री ते भारताचे सलग दहा वर्षे पंतप्रधान अशी देदीप्यमान कारकीर्द त्यांनी गाजविली. जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांमध्ये त्यांची गणना होत असे.