PM Modi GDP Growth Pudhari
राष्ट्रीय

PM Modi GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था वेगाने धावतेय! GDP वाढीवर PM मोदींचा खास व्हिडिओ; विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

PM Modi GDP Growth: भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘वोकल फॉर लोकल’, स्वदेशी आणि ‘वेड इन इंडिया’चा स्वीकार करण्याचे आवाहन करत 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकारण्याचा संकल्प मोदींनी केला.

Rahul Shelke

PM Modi GDP Growth: भारताच्या अर्थव्यवस्थेने आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत 7.8 टक्क्यांची दमदार वाढ केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले. ही वाढ केवळ आर्थिक आकडेवारी नसून, देशातील 140 कोटी नागरिकांच्या संकल्पशक्ती, मेहनत आणि सामूहिक सामर्थ्याचे प्रतिबिंब असल्याचे मोदी यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या या आर्थिक कामगिरीचे कौतुक करताना जागतिक अस्थिरतेचा उल्लेख केला. युद्धजन्य परिस्थिती, विविध संकटे आणि विस्कळीत झालेली जागतिक पुरवठा साखळी अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारत वेगाने प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘जग संकटात, तरी भारत वेगाने पुढे’

मोदी म्हणाले की, जग सध्या युद्ध आणि विविध संकटांनी वेढलेले आहे. अनेक भागांतून युद्धाच्या बातम्या येत आहेत, तर जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. 2020 मध्ये कोविड-19 महामारीचा काळ सुरू झाल्यापासून जगाला स्थैर्याच्या अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.

या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही भारताने आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवला आहे. 7.8 टक्के GDP वाढ ही भारतीयांच्या सामूहिक शक्तीचे आणि त्यांच्या कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले.

‘झूठ की गूंज’ पसरवणाऱ्यांवर निशाणा

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील नकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्यांवरही टीका केली. भारतात काही लोक निराशेच्या गर्तेत बुडून ‘झूठ की गूंज’ आणि निराशा पसरवण्यात व्यस्त आहेत, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.

मात्र, अशा सर्व नकारात्मकतेवर मात करत भारताने 7.8 टक्के आर्थिक वाढ साध्य केली आहे. त्यामुळे देशवासीयांनी या कामगिरीचा आनंद साजरा करण्यासोबतच विकासाची ही गती कायम ठेवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन मोदी यांनी केले.

आत्मनिर्भर भारतासाठी ‘स्वदेशी’चा मंत्र

भारताने पुढे जाण्यासाठी आत्मनिर्भर होणे अत्यंत आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. यासाठी ‘वोकल फॉर लोकल’ आणि स्वदेशीचा मंत्र अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले.

परदेशात अनावश्यक प्रवास आणि खर्च टाळून देशातीलच पर्यटनाला प्रोत्साहन द्यावे, असे मोदी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे विवाहसोहळे परदेशात करण्याऐवजी ‘वेड इन इंडिया’ या संकल्पनेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले.

अनावश्यक सोन्याच्या खरेदीवरही मोदींचा संदेश

देशाच्या आत्मनिर्भरतेवर भर देताना पंतप्रधान मोदी यांनी अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहनही केले. देशवासीयांनी स्वदेशी उत्पादनांना आणि स्थानिक व्यवसायांना अधिकाधिक प्राधान्य दिल्यास देशाची आर्थिक ताकद आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आपण जितका स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर भर देऊ, तितका भारत अधिक मजबूत होईल,” असा संदेश त्यांनी दिला.

‘विकसित भारता'चे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प

भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देशाची युवा पिढी विकसित भारताची जबाबदारी स्वीकारेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

आजच्या पिढीने आपल्या मेहनतीच्या माध्यमातून तरुणांच्या स्वप्नांना आकार देण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘नीती योग्य, नियत साफ’

सरकारची नीती योग्य असून नियत स्वच्छ आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले. देशातील 140 कोटी नागरिकांची शक्ती एकजूट होऊन भारताला नव्या उंचीवर घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले.

7.8 टक्के GDP वाढीचा आनंद साजरा करा, मात्र त्यासोबत देशाला पुढे नेण्याचा संकल्पही करा, असे आवाहन करत मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.

GDP आकडेवारी एक नजर

  • Q1 FY27 (एप्रिल-जून 2026): 7.8%

  • Q4 FY26 (जानेवारी-मार्च 2026): 8.6%

  • Q1 FY26 (एप्रिल-जून 2025): 6.9%

  • RBI चा अंदाज: 7%

  • वास्तविक GDP वाढ: 7.8%

एकूणच, भारताच्या GDPची 7.8 टक्के वाढ ही अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक बाब मानली जात आहे. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी सरकारच्या आर्थिक कामगिरीबाबत विश्वास व्यक्त करत नकारात्मकता पसरवणाऱ्यांवरही जोरदार निशाणा साधला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT