PM Modi Zelenskyy phone call Ukraine war : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी पंतप्रधान मोदींना सुरू असलेल्या संघर्षाबाबतच्याघडामोडींची माहिती दिली. या संवादादरम्यान, पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितले की, सुरू असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या दिशेने केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांमध्ये योगदान देण्यासाठी भारत सज्ज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संभाषणामध्ये दोन्ही नेत्यांनी रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीवर आणि भारत-युक्रेन द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उपायांवर सविस्तर चर्चा केली.
या संवादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स' वर पोस्ट केली की, "अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी अतिशय फलदायी चर्चा झाली. आम्ही आमच्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला असून भारत-युक्रेन संबंध अधिक मजबूत करण्यावर आमचे एकमत झाले आहे."
"सुरू असलेला संघर्ष, त्याचे मानवीय पैलू आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर आपली भूमिका मांडल्याबद्दल मी अध्यक्ष झेलेन्स्की यांचे आभार मानतो. या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा मी पुनरुच्चार केला आहे."
युक्रेनमधील अनेक शहरे आणि नागरिकांना रशियन हल्ल्यांमुळे वीज, पाणी आणि हीटिंग (ऊर्जा) पुरवठ्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लेयेन यांच्याशीही चर्चा केली.
झेलेन्स्की यांनी 'X' वर माहिती दिली की, "रशियन हल्ल्यांमुळे आमची अनेक शहरे सध्या वीज आणि पाण्याच्या भीषण संकटाचा सामना करत आहेत. कीव्ह, डनिप्रो, सुमी, डोनेत्स्क आणि खेरसन भागात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मी उर्सुला यांना या आव्हानांची माहिती दिली असून युरोपीय युनियन तातडीने विशेष आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यास तयार झाली आहे. यामुळे युक्रेनला आवश्यक ती आर्थिक व तातडीची मदत जलद गतीने मिळेल."
केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 'ANI' ला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले की, भारत रशिया, युक्रेन आणि अमेरिकेच्या संपर्कात असून नागरी जहाजांवरील हल्ले रोखणे, धान्य निर्यात पूर्ववत करणे आणि ऊर्जा पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी सातत्याने राजनैतिक प्रयत्न करत आहे.जयशंकर म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी नवी दिल्ली आणि बिशकेक येथे या विषयावर चर्चा केली आहे. मी स्वतः मॉस्को आणि कीव्हचा दौरा करून उभय देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे."