नवी दिल्ली : गेल्या दहा वर्षांत सत्ताधारी विरुद्ध विरोधक हे चित्र दाखवताना जवळजवळ सर्वच माध्यमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसर्या बाजूला राहुल गांधी, असे चित्र दाखवण्यात आले; मात्र हे चित्र अधिकृतरीत्या पहिल्यांदाच 2024 च्या लोकसभेनंतर खरे झाले. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी असले, तरी विरोधी पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने अधिकृत विरोधी पक्षनेते पदच विरोधकांकडे नव्हते. दहा वर्षांच्या मोठ्या कालखंडानंतर विरोधी पक्षनेतेपद विरोधकांकडे आले आणि काँग्रेसने राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपदी नेमले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समोर विरोधी पक्षनेते राहुल गांधी असा सामना पहिल्यांदाच लोकसभेत रंगत आहे. याचा ट्रेलर आपण यापूर्वी झालेल्या अधिवेशनांमध्ये पाहिला. येत्या 22 ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनात हा सामना अधिक रंगतदार होताना पाहायला मिळणार आहे.
पहिल्या अधिवेशनात लोकसभा सदस्यांचा शपथविधी, काही राज्यसभा सदस्यांचा शपथविधी, राष्ट्रपतींचे अभिभाषण, अभिभाषणावर चर्चा या गोष्टींमुळे जास्त वेळ मिळाला नाही; मात्र राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते म्हणून आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. एनडीए म्हणून भाजपसोबत काही पक्ष असले तरी गेल्या दहा वर्षांत एकट्या भाजपकडे सत्तेसाठीचे संख्याबळ होते. यावेळी मात्र भाजपकडे तो आकडा नाही. याउलट प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पदासाठी पुरेसा आकडा आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी आव्हान देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे दोन्ही नेते सभागृहात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
केंद्र सरकारची अग्निवीर योजना, देशात वाढत असलेली महागाई, बेरोजगारी, संविधानावर होत असलेले हल्ले, नीट पेपरफुटी असे विविध मुद्दे विरोधी पक्षाच्या वतीने संसदेत गेल्या अधिवेशनात मांडले गेले. आगामी अधिवेशनात देखील हे सगळे मुद्दे चर्चेचा विषय ठरणार आहे. राहुल गांधींना आम्ही भीक घालत नाही, असे म्हणणारे विरोधक आता राहुल गांधींच्या भाषणानंतर एका मागून एक पत्रकार परिषदा घेतात, त्यावरून राहुल गांधींना सत्ताधारी किती गांभीर्याने घेतात हे कळते. मागील अधिवेशनात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे देशातला सगळा हिंदू समाज नाही’, असे आक्रमक वक्तव्य करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जवळजवळ सगळ्या सत्ताधारी लोकांना उभे व्हायला भाग पाडले. अग्निवीर योजनेवरूनही राहुल गांधी चांगलेच आक्रमक आहेत. त्यामुळेच की काय अग्निवीरांना सीआयएसएफमध्ये आणि बीएसएफमध्ये दहा टक्के आरक्षणाची घोषणा सरकारला करावी लागली. आगामी अधिवेशनात नीट परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारावरूनही विरोधक सरकारवर चांगलाच हल्लाबोल करणार आहेत.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध योजना जाहीर करत आहेत. केंद्र सरकार लोक कल्याणाचे अनेक निर्णय घेत असल्याचे ते सांगतात, तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेची पोलखोल करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. दरम्यान, यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधी टीका करत होते किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरही राहुल गांधी हेच टीकेचे लक्ष्य राहत होते. मात्र, आतापर्यंत हा सामना संसदेच्या बाहेर होता; आता हे दोन्ही प्रमुख नेते संसदेत एकमेकांसमोर असणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत बाहेर होत असलेला सामना आता थेट सभागृहात होणार आहे. गेल्या दहा वर्षांत सत्ताधार्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधकांसाठी राहुल गांधी असे चित्र दाखवण्यात आले. या दोघांमधील सामना पुढची 5 वर्षे पाहायला मिळणार आहे. मात्र, हा सामना कोण जिंकणार, हे येणारा काळच सांगेल...
विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडे नेता म्हणून लागणारा अभिनिवेश नसला, तरी राहुल गांधींची मुद्देसूद मांडणी खोडून काढणे सत्ताधार्यांना डोईजड होण्याची शक्यता आहे. संसदेतील विविध आयूधांचा अभ्यास करत पंतप्रधानांसह अगदी लोकसभा अध्यक्षांनाही त्यांनी काही गोष्टी परखडपणे सांगितल्या. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील सामना हा दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होणार आहे. सत्ताधारी एनडीएकडे पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी असे अनुभवी नेते आहेत, तर इंडिया आघाडीमध्ये समोरच्या बाकांवर राहुल गांधींसोबत के. सुरेश, शशी थरूर अशा अनुभवी चेहर्यांसह दिपेंदर हुड्डा, गौरव गोगोई, प्रणिती शिंदे असे तरुण सदस्यही आहेत. राहुल गांधींच्या सोबतीला असलेली ही तरुण फळीदेखील सरकारवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत भाजपची जी ताकद सभागृहात होती, ती यापुढे तुलनेने कमी असणार आहे. भाजपची ताकद कमी करणे आणि विरोधी पक्षांची ताकद वाढवणे; मात्र सत्तेची सूत्रे भाजपकडेच ठेवणे, असा काहीसा जनादेश देशातील जनतेने दिला आहे.