पीएम मोदी गुरूवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.  (File Photo)
राष्ट्रीय

PM Modi Mumbai Visit | महाराष्ट्र दिनी पीएम मोदी मुंबई दौऱ्यावर; वेव्हज परिषदेचे करणार उद्घाटन

WAVES Summit 2025 | परराष्ट्रमंत्री, माहिती तंत्रज्ञान मंत्री राहणार उपस्थित

पुढारी वृत्तसेवा

WAVES Summit 2025

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, महाराष्ट्र दिनी मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज २०२५) उद्घाटन करतील. “कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज” या घोषवाक्याने प्रेरित १ ते ४ मे दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील निर्माते, स्टार्टअप्स, उद्योजक आणि धोरणकर्ते एकत्र येणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव देखील या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित असतील.

देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचा वापर करणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनानुसार, चित्रपट, ओटीटी, गेमिंग, कॉमिक्स, डिजिटल माध्यम, एआय, प्रसारण आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान वेव्हज परिषदेमध्ये एका व्यासपीठावर असेल. यामुळे भारताच्या माध्यम आणि मनोरंजन कौशल्याचे व्यापक प्रदर्शन होईल. २०२९ पर्यंत ५० अब्ज डॉलर्सची मनोरंजन बाजारपेठ तयार करणे हे वेव्हजचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे जागतिक मनोरंजन अर्थव्यवस्थेत भारताचा ठसा उमटेल.

भारताने प्रथमच जागतिक माध्यम संवादाचे केले आयोजन

वेव्हज परिषदेमध्ये, भारताने प्रथमच जागतिक माध्यम संवादाचे आयोजन केले आहे. यामध्ये २५ देशांच्या मंत्र्यांचा सहभाग असेल. स्थानिक आणि जागतिक स्तरावर खरेदीदार आणि विक्रेते यांना जोडण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे व्यापक जाळे आणि व्यवसाय संधी तयार होतील. वेव्हज २०२५ मध्ये ९० हून अधिक देशांचा सहभाग असेल. परिषदेत १०,००० हून अधिक प्रतिनिधी, १,००० निर्माते, ३०० पेक्षा अधिक कंपन्या आणि ३५० पेक्षा जास्तीचे स्टार्टअप्स असतील.

२ मेरोजी पंतप्रधान मोदी केरळ आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर

मुंबईतील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळला जाणार आहेत. २ मेरोजी केरळमधील विझिंजम बहुउद्देशीय बंदराचे लोकार्पण करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील. त्यानंतर २ मे रोजी आंध्र प्रदेशच्या अमरावतीमध्ये ५८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT