PM Modi to Address Nation Tonight: नरेंद्र मोदी आज (शनिवार) रात्री साडेआठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. महिलांच्या आरक्षण विधेयकाबाबत ते बोलणार असल्याने देशाचं लक्ष या भाषणाकडे लागलं आहे.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला अपेक्षित पाठिंबा न मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधानांचं हे संबोधन होत आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका केली. महिलांसाठी असलेल्या या महत्त्वाच्या विधेयकाला पाठिंबा न देणं ही गंभीर चूक असल्याचं त्यांनी म्हटलं.
पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या भूमिकेला “महिलांविरोधी” असे संबोधत, भविष्यात याची राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशाराही दिल्याचं सांगितलं जात आहे. तसेच हा संदेश देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यावर त्यांनी भर दिला.
विरोधी पक्ष सध्या आपली भूमिका योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही पंतप्रधानांनी कॅबिनेट बैठकीत नमूद केलं. आजच्या संबोधनात पंतप्रधान महिला आरक्षण विधेयक, त्यामागची भूमिका आणि सरकारचा पुढील मार्ग याबाबत स्पष्ट भूमिका मांडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “काल लोकशाहीचा मोठा विजय झाला,” असं म्हणत त्यांनी या संपूर्ण घडामोडींना संविधान आणि लोकशाहीच्या विजयाची उपमा दिली.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, केंद्रातील भाजप (BJP) सरकारने लोकशाही कमकुवत करण्याचा आणि संघीय रचनेत बदल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विरोधकांच्या एकतेमुळे ही योजना अपयशी ठरली. “हा देशाचा विजय आहे, संविधानाचा विजय आहे आणि विरोधकांच्या एकतेचा विजय आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
त्यांनी पुढे आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणांमधून स्पष्ट केलं की, जर विरोधकांनी या विधेयकाला पाठिंबा दिला नाही, तर त्यांना भविष्यात राजकीय नुकसान होईल. “यावरूनच सरकारचा खरा हेतू समोर येतो,” असं म्हणत त्यांनी सत्तेसाठी महिलांचा मुद्दा वापरल्याचा आरोप केला.