राष्ट्रीय

PM Narendra Modi youth message : ‘थँक्यू फ्रेंड्स...!’ पंतप्रधान मोदींचा तरुणांना पुन्हा एक खास संदेश

पंतप्रधान मोदींच्या आधीच्या व्हिडिओलाही सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला होता

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री इन्स्टाग्रामवर व्हिडिओ संदेश जारी करत देशातील तरुणांचे आभार मानले. यापूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओवर तरुणांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया, सूचना आणि पाठिंब्याबद्दल मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. काल रात्री तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मी शेअर केलेल्या व्हिडिओवर तुम्ही दिलेल्या सकारात्मक सूचना आणि प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचे प्रेम असेच कायम राहो. आपला हा संवाद आणखी सक्रियपणे पुढे सुरू राहील, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले.

पेपरफुटीच्या मुद्द्यावर मोदींचा आधीचा संदेश

गुरुवारी रात्री पंतप्रधान मोदी यांनी पेपरफुटीच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची भूमिका मांडली होती. पेपरफुटी हा लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत गंभीर आणि वेदनादायक विषय असल्याचे त्यांनी म्हटले होते. या संदर्भात गेल्या अडीच महिन्यांत अनेक पावले उचलण्यात आली असून, मंत्रिमंडळातील सदस्यांच्या सूचनांनंतर प्रस्तावाला अंतिम रूप दिले जाईल, असेही मोदी यांनी सांगितले होते. संसदेचे अधिवेशन सुरू होताच संबंधित विधेयक लवकरात लवकर मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

व्हिडिओला तुफान प्रतिसाद

पंतप्रधान मोदींच्या आधीच्या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला. अवघ्या २४ तासांत या व्हिडिओला तब्बल २८ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओनंतर मोदींच्या नव्या संदेशाचीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तरुणांच्या प्रतिक्रिया आणि सूचनांना थेट प्रतिसाद देत पंतप्रधानांनी साधलेल्या या संवादामुळे सोशल मीडियावरील त्यांची डिजिटल पोहोच पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT