Eknath Shinde Pudhari
राष्ट्रीय

Seva Sankalp Abhiyan| वडनगरहून उठलेल्या ठिणगीने संपूर्ण भारतात क्रांती घडवली - शिंदे

वडनगर, गुजरात येथून राष्ट्रव्यापी ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

अहमदाबाद (वडनगर): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांच्या सेवेला अभिवादन करण्यासाठी वडनगर, गुजरात येथून राष्ट्रव्यापी ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, भाजपा प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा, हेमांग जोशी यांच्यासह खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारच्यावतीने मोदींना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

वडनगरच्या पवित्र भूमीत येणे हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत शिंदे यांनी या भूमीला नमन केले. “वडनगरच्या मातीतून उमटलेला एका बालकाचा आवाज आज देशातच नव्हे, तर जगभर घुमत आहे,” असे ते म्हणाले. वडनगर ते वाराणसी ही यात्रा केवळ प्रवास नसून सेवेपासून समर्पण, संकल्पापासून परिवर्तन आणि परिवर्तनापासून विकसित भारताकडे जाणारी यात्रा असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात पदे व जबाबदाऱ्या बदलल्या; मात्र सेवेचा संकल्प बदलला नाही, असे शिंदे म्हणाले. एनडीए बैठकीत अमित शाह यांनी यंदाचा जन्मदिन व्यापक स्वरूपात साजरा करून सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक गरीबापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले होते, त्याच भावनेतून अभियान सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“मोदींच्या बाबतीत वयाचे आकडे नव्हे, तर कर्तृत्वाची उंची मोजली जाते; ती हिमालयाच्या उंचीने आणि जनतेप्रती कार्याची खोली अरबी समुद्राने मोजावी,” असे शिंदे म्हणाले. गॅस, पक्की घरे, बँक खाती आणि नळाचे पाणी यांसारख्या योजनांमुळे विकास सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडला गेला असून योजना कागदावरून जीवनात पोहोचली तरच तिची सार्थकता, असे त्यांनी नमूद केले.

भारत दहाव्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचा संकल्प आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि आत्मनिर्भर भारत वेगाने पुढे जात आहेत. कलम 370 हटविणे, देशाची सुरक्षा आणि भारतीय लष्कराची क्षमता यामुळे नवा भारत उभा राहिला आहे, असे ते म्हणाले.

BRICS, ग्लोबल साऊथ, डिजिटल तंत्रज्ञान, योग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यामध्ये भारताची भूमिका वाढली असून विविध देशांनी मोदींना सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले; हा 140 कोटी भारतीयांचा गौरव असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राम मंदिर, काशी विश्वनाथ धाम आणि तीर्थक्षेत्रांचा विकास करताना AIसारख्या आधुनिक तंत्रज्ञानासोबत भारतीय संस्कृती, मूल्ये आणि मानवी भावना जपल्या जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा गांधी व सरदार पटेल यांच्या गुजरातमधून स्वातंत्र्याचा संकल्प जनआंदोलन झाला; याच भूमीतून मोदींनी विकसित भारताचा संकल्प राष्ट्रीय ध्येय बनविला. आर्थिकदृष्ट्या मजबूत, तंत्रज्ञानसक्षम, आत्मनिर्भर, सुरक्षित, गरीब व युवकांना संधी देणारा आणि महिलांचा सन्मान करणारा भारत घडविणे हे ध्येय असल्याचे शिंदे म्हणाले. “वडनगरची चिंगारी आज भारताची क्रांती बनली असून ती 2047 च्या विकसित भारताची आवाज बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोदी हे भारताच्या प्रगतीची कहाणी, गरीब कल्याणाची निशाणी, युवकांच्या स्वप्नांची जवानी, संकटातील हिम्मतीची रवानी आणि नव्या भारताची निशाणी असल्याचे सांगत शिंदे यांनी त्यांना निरोगी दीर्घायुष्य आणि देशसेवेसाठी शक्ती-बळ लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT