PM Modi Jhalmuri Jhargram PM Narendra Modi 'X'
राष्ट्रीय

PM मोदींनी झालमुरी खाल्ल्यानंतर बंगालच्या निवडणुकीचा ट्रेंड कसा बदलला? 'त्या' दुकानदाराची आता एकच विनंती...

PM Modi Jhalmuri Jhargram: पश्चिम बंगालमधील झाडग्राम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्त्याकडेला थांबून घेतलेल्या ‘झालमुरी’च्या आस्वादानंतर स्थानिक राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

West Bengal Elections 2026 PM Modi Jhalmuri Jhargram

झाडग्राम: पश्चिम बंगालमधील झाडग्राम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रस्त्याकडेला थांबून घेतलेल्या ‘झालमुरी’च्या आस्वादानंतर स्थानिक राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पंतप्रधानांच्या या अनौपचारिक भेटीचा प्रभाव कमी करण्यासाठी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) रणनीती आखली आणि त्याच मार्गावरून दुसऱ्या दिवशी महिलांची मोठी रॅली काढली.

दरम्यान, ज्या दुकानात पंतप्रधानांनी झालमुरी खाल्ली होती, तो विक्रेता आता एका रात्रीत सेलिब्रिटी बनला असून त्याने या घटनेचे राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधानांनी ज्याच्या दुकानात झालमुरी खाल्ली, तो विक्रम साव सध्या प्रसारमाध्यमांच्या केंद्रस्थानी आहे. त्याच्या दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी होत असून सतत येणाऱ्या फोनमुळे त्याने आपला मोबाईल बंद ठेवाला आहे. मात्र, या प्रसिद्धीच्या लाटेत त्याने एक महत्त्वाची भूमिका मांडली आहे. "माझ्या दुकानात पंतप्रधान थांबले, यात कोणताही राजकीय हेतू म्हणून पाहू नका. माझे दुकान पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे आणि इथे सर्वच पक्षांचे नेते व कार्यकर्ते येत असतात," असे विक्रम याने म्हटले आहे. विशेष म्हणजे, विक्रम हा मूळचा बिहारमधील गया येथील रहिवासी असून आजही तो बिहारचाच मतदार आहे.

टीएमसीचा पलटवार; त्याच मार्गावर केले शक्तिप्रदर्शन

पंतप्रधानांच्या या दौऱ्याला उत्तर देण्यासाठी तृणमूल काँग्रेसने दुसऱ्याच दिवशी त्याच रस्त्यावर शक्तिप्रदर्शन केले. मोठ्या संख्येने महिला या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या हातात 'भाजपला मत देणार नाही', अशा आशयाचे फलक होते. तसेच, आदिवासी नेत्यांचे फोटो घेऊन टीएमसीने हा भाग आपला बालेकिल्ला असल्याचे आणि आदिवासींचे हित केवळ त्यांच्याच हाती सुरक्षित असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

झालमुरीने 'ट्रेंड' बदलणार का?

बंगालच्या निवडणुकीत नेहमीच अशा छोट्या प्रसंगांना मोठे राजकीय वलय प्राप्त होते. रविवारी पंतप्रधान मोदींनी इथे थांबून स्थानिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला आणि सोमवारी टीएमसीने तिथेच मोर्चा काढला. त्यामुळे झाडग्राममधील ही 'झालमुरी' मतदारांच्या मनावर किती परिणाम करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

"माझ्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा मी आदर करतो. पंतप्रधान मोदींच्या येण्याला राजकीय दृष्टीने पाहू नका, हे एक सामान्य व्यावसायिक नाते आहे."
विक्रम साव, झालमुरी विक्रेता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT