PM Modi Jantar Mantar Protest Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या माध्यमातून देशातील तरुणांशी संवाद साधला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे घडलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी काही आंदोलनकर्त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या दिवंगत आईला शिवीगाळ केल्याची खंत व्यक्त केली. मात्र, या घटनेकडे सूड किंवा रागाने न पाहता, संबंधित तरुणांना योग्य दिशा दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हिडिओच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज मनापासून तुमच्याशी काही गोष्टी बोलाव्याशा वाटतात. जंतर-मंतरवर जे काही घडलं, ते संपूर्ण देशाने आणि जगाने पाहिलं. काही तरुणांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि असभ्य भाषेचा वापर केला. मला शिवीगाळ करण्यात आलीच, पण माझ्या दिवंगत आईबद्दलही अपमानास्पद शब्द वापरण्यात आले."
'ही मुलं भरकटली आहेत, त्यांना योग्य मार्ग दाखवणं आपलं काम'
पंतप्रधान मोदी म्हणाले की, लहानपणी किंवा तरुण वयात चुका होऊ शकतात आणि त्या चुका सुधारण्याची संधीही समाजाने द्यायला हवी. "चुका होणं हे बालपणाचा आणि तरुणपणाचा भाग असतो. त्यामुळे या मुलांकडे केवळ दोषी म्हणून न पाहता, त्यांना योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी आपली आहे," असे त्यांनी सांगितले.
समाजातील संताप समजू शकतो
या घटनेनंतर समाजात निर्माण झालेला संताप आपण समजू शकतो, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. विशेषतः काही तरुणींनी वापरलेल्या भाषेबद्दल अनेकांना धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. "आपल्या मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, हा अनेकांसाठी सांस्कृतिक धक्का आहे. समाजात निर्माण झालेला आक्रोश मला पूर्णपणे समजतो," असे मोदी म्हणाले.
संयम आणि संस्कार- पंतप्रधान मोदींचा मेसेज
या व्हिडिओद्वारे पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना संयम, सुसंस्कृत संवाद आणि सभ्य भाषेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. मतभेद असू शकतात, आंदोलन करण्याचा अधिकारही प्रत्येकाला आहे; मात्र कोणत्याही परिस्थितीत अपमानास्पद भाषा किंवा वैयक्तिक पातळीवरील टीका योग्य नसल्याचा मेसेज त्यांनी दिला. पंतप्रधानांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.