Tarique Rahman oath ceremony file photo
राष्ट्रीय

PM Modi: बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण

Tarique Rahman oath ceremony: बांगलादेशात नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी बांगलादेशने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे.

मोहन कारंडे

नवी दिल्ली : शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर बांगलादेशात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर, नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी बांगलादेशने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे.

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान १७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. भारताने अद्याप अधिकृतपणे निमंत्रण मिळाल्याची पुष्टी केलेली नाही. दोन्ही देश द्विपक्षीय संबंध नव्याने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असताना, पंतप्रधान मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार का, याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ ढाका येथील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी एकूण १३ देशांना निमंत्रण दिले आहे. यामध्ये भारत, चीन, सौदी अरेबिया, पाकिस्तान, तुर्की, संयुक्त अरब अमिराती, कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान यांचा समावेश आहे.

१७ वर्षे लंडनमध्ये घालवल्यानंतर तारिक रहमान बांगलादेशचे नवे नेते म्हणून समोर आले आहेत. त्यांच्या पक्षाने २९७ पैकी २०९ जागा जिंकल्या आहेत, तर पाकिस्तानशी जवळीक मानल्या जाणाऱ्या जमात-ए-इस्लामीने ६८ जागा जिंकल्या आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या 'अवामी लीग'ला निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती.

रहमान यांची परराष्ट्र नीती

विजयानंतर भारतासोबतच्या संबंधांवर भाष्य करताना रहमान म्हणाले की, "बांगलादेशचे हित" हेच त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा पाया असेल. ते म्हणाले की, भारत, चीन आणि पाकिस्तान यांसारख्या प्रादेशिक शक्तींशी संतुलित संबंध राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि ते कोणत्याही देशाला मालक मानत नाहीत. तसेच, बीएनपीने भारतासोबत सकारात्मक संवाद साधण्याची आणि दक्षिण आशियातील शांतता व स्थिरतेसाठी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT