नवी दिल्ली : ‘यशभूमी’ येथे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘सेमीकॉन इंडिया २०२६’ परिषदेचे उद्‌घाटन झाले. यावेळी सोबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री जितिन प्रसाद आदी.  (पीटीआय फोटो)
राष्ट्रीय

PM Narendra Modi : सेमीकंडक्टर उत्पादनाचे भारत जागतिक केंद्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ५० देशांच्या प्रतिनिधींसमोर ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : चिप निर्मितीच्या क्षेत्रात भारत जागतिक केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. भारतामध्ये तयार झालेल्या चिप्सवर जगाचा विश्वास आहे. हा विश्वास अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने चिप उत्पादनाचे बजेट वाढवले आहे. सरकारने ‘सेमीकंडक्टर मिशन’च्या दुसऱ्या टप्प्याचे बजेट वाढवून १३.५ अब्ज डॉलर केले आहे. एवढेच नव्हे तर भारत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगचे ‘नवीन आणि विश्वासार्ह’ केंद्र बनले आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिली.

यशभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये गुरुवारी ‘सेमीकंडक्टर इंडिया २०२६' परिषदेचे उद्‌घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. परिषद तीन दिवस चालणार आहे. यामध्ये ५० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

यावेळी मोदी म्हणाले, भारताच्या अर्थव्यवस्थेसोबतच जगाचा आत्मविश्वासही वाढत आहे. आतापर्यंत १२ चिप प्रकल्पांना मंजुरीही दिली आहे. जागतिक चिप उत्पादकांनी भारतातील संधींचा गांभीर्याने विचार करावा. या जागतिक कंपन्यांनी येथे गुंतवणूक करण्याचे आणि वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञान परिसंस्थेचा लाभ घ्यावा.

चिपपासून संपूर्ण साखळीवर भर

ते म्हणाले की, भारत आता केवळ चिप डिझाईन आणि असेंब्लीपुरता मर्यादित न राहता फॅब्रिकेशन, ॲडव्हान्स पॅकेजिंग, उपकरणे, साहित्य आणि संशोधनासह संपूर्ण सेमीकंडक्टर परिसंस्थेचा विकास करत आहे. भारत हा कंपाऊंड सेमीकंडक्टर आणि सिलिकॉन फोटोनिक्ससारख्या तंत्रज्ञानावरही काम करत आहे. पंतप्रधानांनी जागतिक सेमीकंडक्टर उपकरणे आणि सुटे भाग (कंपोनंटस्‌) बनवणाऱ्या कंपन्यांना भारतात उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

मोहाली आणि सुरत येथील दोन प्रकल्पांमध्ये व्यावसायिक उत्पादन सुरू झाले असून भारतात तयार होणाऱ्या चिप्स देशांतर्गत तसेच जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचू लागल्याचे मोदी यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सेंटर आणि सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पांसाठी अखंडित वीजपुरवठा आवश्यक आहे. त्यामुळे भारत ऊर्जा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

तीन हजार किलोमीटरचे मालवाहतूक कॉरिडॉर सुरू

पंतप्रधानांनी देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या बदलांचाही उल्लेख केला. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या १० दिवसांत सुमारे तीन हजार किलोमीटरचे समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) पूर्णपणे कार्यान्वित झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. यामुळे मालाची ने-आण जलद होईल, लॉजिस्टिक व्यवस्था सुधारेल आणि उत्पादन क्षेत्रालाही बळकटी मिळेल. भारतात झालेली ब्रिक्स परिषद जागतिक विश्वासाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

इंजिनिअरिंगच्या एक लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

सरकार सेमीकंडक्टर उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ तयार करत आहे. एक लाख इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी ७० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

५० हून अधिक देशांचा सहभाग

  • 'सेमीकॉन इंडिया २०२६'मध्ये ६०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग.

  • ५० हून अधिक देशांचे प्रतिनिधी मंडळ.

  • जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, नेदरलँडस्‌, सिंगापूर आणि स्वीडन या देशांचे स्वतंत्र मंडप.

  • स्टार्टअप पॅव्हेलियनमध्ये सेमीकंडक्टर क्षेत्रातील नवीन कंपन्यांकडूनउत्पादने, तंत्रज्ञानांचे प्रदर्शन

  • कच्च्या मालापासून आणि चिप डिझाईनपासून ते फॅब्रिकेशन, पॅकेजिंग आणि तयार इलेक्ट्रॉनिक प्रणालींपर्यंतच्या संपूर्ण मूल्य साखळीचा समावेश.

ॲॅप्लाईड मटेरिअर्सची ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक

कार्यक्रमादरम्यान ‘ॲप्लाईड मटेरिअर्स'ने व्हिजन २०३५ अंतर्गत भारतात पाच अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली. ही कंपनी भारताची सेमीकंडक्टर परिसंस्था जागतिक मूल्य साखळीशी (व्हॅल्यू चेन) जोडण्याच्या दिशेने काम करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT