PM Modi West Bengal West Bengal CM oath ceremony
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावत भारतीय जनता पक्षाचे पहिले सरकार बंगालमध्ये स्थापन झाले. ब्रिगेड परेड ग्राऊंडवर पार पडलेल्या ऐतिहासिक सोहळ्यात आज सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ९८ वर्षीय ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार यांच्यातील भावनिक भेट. पंतप्रधानांनी या वृद्ध कार्यकर्त्याच्या चरणांना स्पर्श करून त्यांना मिठी मारली, तेव्हा संपूर्ण मैदान टाळ्यांच्या कडकडाटाने आणि 'जय श्री राम'च्या घोषणांनी दणाणून गेले.
ब्रिगेड परेड ग्राऊंडवर सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदींचे सकाळी १० च्या सुमारास आगमन झाले. व्यासपीठाकडे जात असताना ९८ वर्षांच्या माखनलाल सरकार यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी मोदींनी शिष्टाचार बाजूला सारून या निष्ठवान कार्यकर्त्याचे पाय धरून आशीर्वाद घेतले. भाजपच्या या ऐतिहासिक विजयात अनेक दशकांपासून संघर्ष करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हेच मोदींनी आपल्या या कृतीतून दाखवले.
माखनलाल सरकार हे पश्चिम बंगालमधील भाजपचे सर्वात जुने कार्यकर्ते आहेत. वयाच्या ९८ व्या वर्षीही ते स्वातंत्र्योत्तर भारतातील राष्ट्रवादी चळवळीच्या मुळांशी दृढपणे जोडलेले आहेत. १९५२ मध्ये, काश्मीरमध्ये भारतीय तिरंगा फडकवण्याच्या चळवळीदरम्यान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत असताना त्यांना अटक करण्यात आली होती. १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर, माखनलाल यांनी पश्चिम दिनाजपूर, जलपाईगुडी आणि दार्जिलिंग या जिल्ह्यांचे संघटनात्मक समन्वयक म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९८१ पासून, त्यांनी सलग सात वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य केले. पक्षाच्या उभारणीच्या सुरुवातीच्या काळात दिलेले हे एक अत्यंत मोलाचे योगदान होते.
कोलकात्याचे प्रसिद्ध ब्रिगेड परेड ग्राऊंड आज भगव्या रंगात न्हाऊन निघाले होते. केवळ बंगालच नव्हे, तर झारखंड आणि अगदी परदेशातूनही भाजप समर्थक या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आले होते. कॅनडाहून आलेल्या एका कार्यकर्त्याने, "बंगालला तृणमूलच्या तावडीतून मिळालेले हे स्वातंत्र्य पाहण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे," अशा भावना व्यक्त केल्या. केंद्रीय मंत्री आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शपथविधी सोहळ्याला बंगालच्या संस्कृतीची जोड देण्यात आली होती. छौ नृत्य आणि आदिवासी कलाकारांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले होते. व्यासपीठाच्या पार्श्वभूमीवर दक्षिणेश्वर काली मंदिर आणि दुर्गा मातेच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधानांनी झाडग्राम येथे ज्या 'झालमुरी'चा आस्वाद घेतला होता, तोच पदार्थ आज आलेल्या समर्थकांना खाऊ घालण्यात आला.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने २९४ पैकी २०७ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. सुवेंदू अधिकारी यांचा मुख्यमंत्री म्हणून झालेला हा शपथविधी पूर्व भारतात भाजपसाठी सर्वात मोठी राजकीय उपलब्धी मानली जात आहे. 'जय श्री राम'च्या घोषणा आणि शंखांच्या नादात बंगालमध्ये आज एका नवीन राजकीय युगाचा प्रारंभ झाला.