PM Modi Ghana visit 2025
ऑनलाईन डेस्क ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक घाना दौर्यावेळी त्यांनी गुरुवारी घानाच्या संसदेत इंग्रजीतून केलेले भाषण विशेष चर्चेचा विषय ठरले. विशेषतः त्यांनी भारतामध्ये 2,500 हून अधिक राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत, हे सांगितल्यावर सभागृहात आश्चर्य आणि हास्याची लाट उसळली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाना संसदेमध्ये दिलेल्या प्रभावी भाषणात जागतिक युद्धानंतरच्या जागतिक व्यवस्थेतील बदलांवर, नव्या संकटांवर आणि दक्षिणेकडील देशांना योग्य अधिकार न दिल्यास प्रगती होऊ शकणार नाही, यावर भर दिला.
त्यांनी घानाच्या संसदेला सन्मानपूर्वक अभिवादन करताना सांगितले की, घाना हा 'सोन्याचा देश' आहे, आणि ते केवळ त्या भूमिगत संपत्तीमुळे नाही तर येथील जनतेच्या उबदार आणि शक्तिशाली मनामुळे आहे. तसेच दोन्ही देशातील व्यापार येत्या पाच वर्षात दुप्पट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि घानाचा संबंध आता व्यापक भागीदारीच्या स्तरावर पोहोचल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, “ज्या पद्धतीने भारताने सर्व प्रकारच्या विचारांना, धर्मांना आणि लोकांना आपल्यामध्ये सामावून घेतले, त्याच मानसिकतेमुळे भारतीय नागरिक जगात कुठेही सहज मिसळतात. भारत घानाच्या विकास प्रवासात एक 'को-ट्रॅव्हलर' आहे." पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचा दोन्ही देशांनी निर्धार केला आहे.
मोदी म्हणाले, दोन्ही देशांच्या वसाहतीकालीन वाईट आठवणी असल्या तरी दोन्ही देशांनी कधीही हार मानली नाही. आपल्या सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक वैविध्याने आम्हाला बल मिळाले आहे. आमचे राष्ट्र स्वातंत्र्य, ऐक्य आणि सन्मान यांच्या तळावर उभे आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित खासदारांशी हस्तांदोलन केले आणि भारत-घाना संबंधांना नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
"India has over 2,500 political parties", असे सांगून त्यांनी क्षणभर थांबून स्मितहास्य केले, त्यावेळी घानाच्या खासदारांमध्ये कुजबुज सुरू झाली. पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा हसत हेच वाक्य म्हटल्यावर उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.
घानाचे संसदीय अध्यक्ष अल्बन किंग्सफोर्ड सुमाना बगबिन यांनीही "2500 राजकीय पक्ष" हे वाक्य पुन्हा उच्चारले आणि पुन्हा एकदा सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "लोकशाही ही आमच्यासाठी केवळ एक व्यवस्था नाही, ती आमचा संस्कार आहे. भारतात 22 अधिकृत भाषा, हजारो बोलीभाषा आणि सुमारे 20 वेगवेगळे पक्ष सध्या राज्ये चालवत आहेत. ही विविधता आणि सर्वसमावेशकता भारताच्या लोकशाहीची खरी ताकद आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "द्वितीय महायुद्धानंतरची जागतिक व्यवस्था जलद गतीने बदलत आहे. तंत्रज्ञानातील क्रांती आणि लोकसंख्येतील बदल यामुळे नव्या संकटांचा सामना करावा लागत आहे. जुन्या संस्था या नव्या समस्यांचा सामना करण्यात अयशस्वी ठरतात.
प्रगतीसाठी दक्षिणेला आवाज देणे आवश्यक आहे. केवळ घोषणांमुळे नव्हे तर कृतीतून यश मिळेल. भारताच्या G-20 अध्यक्षकाळात अफ्रिकी संघटनेला G-20 मध्ये कायमस्वरूपी सदस्यत्व मिळाले."
मोदी यांनी भारताच्या तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातील यशाचा आढावा घेतला. "भारतातील स्टार्टअप्सची संख्या जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आम्ही जागतिक औषधसंस्था म्हणून ओळखले जातो.
भारताने चंद्रयान मिशनद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले आहे आणि सध्या भारतीय अंतराळवीर जागतिक अंतराळ स्थानकावर मानवाच्या पुढील प्रवासासाठी प्रयोग करत आहे."
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने ‘मिशन लाइफ’ ही योजना सुरु केली आहे ज्याद्वारे हवामान बदलाला तोंड देण्याचा आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताने ‘आंतरराष्ट्रीय सौर संघटना’, ‘एक पृथ्वी, एक सूर्य, एक ग्रिड’ सारख्या जागतिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला आहे, ज्यामध्ये घाना सारख्या देशांनीही महत्त्वपूर्ण सहभाग घेतला आहे.
पंतप्रधान मोदी यांना घानाच्या राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रमनी महामाने ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ या राष्ट्रीय सन्मानाने सन्मानित केले. मोदी यांनी हा सन्मान भारत-घाना मैत्रीच्या प्रतीक म्हणून स्वीकारला.
हा दौरा भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांचा घानाला तीन दशकांनंतरचा पहिलाच दौरा आहे. यानंतर पंतप्रधान मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगो (3-4 जुलै), अर्जेंटिना (4-5 जुलै), ब्राझील (BRICS परिषद), आणि नामीबिया या देशांचा दौरा करतील.