पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. २६) अहमदाबाद येथे मारुती सुझुकीच्या इलेक्ट्रिक कार आणि बॅटरी उत्पादन प्रकल्पाचे (मॅन्युफॅक्चरिंग प्लांट) उद्घाटन केले.या प्रकल्पामध्ये हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोड्सचे उत्पादन केले जाणार आहे. याशिवाय, मारुती सुझुकीची पहिली जागतिक बॅटरी इलेक्ट्रिक वाहन (BEV), 'ई-व्हिटारा' (e VITARA), ही जपान आणि अनेक युरोपीय राष्ट्रांसह १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे. आता जगातील अनेक देशांमध्ये ज्या ईव्ही चालतील, त्यावर लिहिलेले असेल - मेड इन इंडिया, असे प्रतिपादन या वेळी पंतप्रधान मोदी यांनी केले.
या वेळी पंतप्रधान माेदी म्हणाले की, 'गणेशोत्सवाच्या उत्साहात आज भारताच्या 'मेक इन इंडिया' यात्रेत एक नवीन अध्याय जोडला जात आहे. मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड हे आमच्या त्या ध्येयाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. आजपासून भारतात बनवलेली इलेक्ट्रिक वाहने १०० देशांना निर्यात केली जातील. तसेच, आज हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोड निर्मितीलाही सुरुवात होत आहे.'
आजचा दिवस भारत आणि जपानच्या मैत्रीलाही एक नवे पर्व सुरु झाले आहे. मी सर्व देशवासियांना, जपान आणि सुझुकी कंपनीला खूप खूप शुभेच्छा देतो. भारताच्या यशोगाथेची बीजे सुमारे १३ वर्षांपूर्वी पेरली गेली होती. २०१२ मध्ये जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा मी मारुती सुझुकीला हंसलपूरमध्ये जमीन दिली होती. तेव्हाही दृष्टी आत्मनिर्भर भारताची होती, मेक इन इंडियाची होती. आमचे तेव्हाचे प्रयत्न आज देशाचे संकल्प पूर्ण करण्यात इतकी मोठी भूमिका बजावत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारताकडे लोकशाहीची शक्ती आहे. भारताकडे लोकसंख्येचा सकारात्मक घटक आहे. आमच्याकडे कुशल मनुष्यबळाचा खूप मोठा साठा आहे. त्यामुळे ही आमच्या प्रत्येक सहकाऱ्यासाठी विन-विन सिच्युएशन म्हणजेच दोघांसाठीही फायद्याची स्थिती निर्माण करते. आज सुझुकी जपान भारतात उत्पादन करत आहे, आणि येथे बनवलेल्या गाड्या पुन्हा जपानला निर्यात केल्या जात आहेत. हे भारत आणि जपानच्या संबंधांच्या मजबुतीचे प्रतीक तर आहेच, शिवाय भारताविषयीच्या जागतिक विश्वासालाही दर्शवते.' गुजरात येथील टीडीएस लिथियम-आयन बॅटरी प्लांटमध्ये हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोडच्या स्थानिक उत्पादन प्लांट तोशिबा, डेन्सो आणि सुझुकी यांचा संयुक्त उपक्रम आहे. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी संचालक तोशिहिरो सुझुकी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील उपस्थित होते.