

मुंबई : मुंबई-पुणे महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवरून सर्व इलेक्टिक वाहनांना टोलमाफी मिळाली आहे. 15 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार असून इलेक्ट्रिक गाड्यांचा प्रवास आता सुसाट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अटल सेतू येथे शुभारंभ होणार असून ईव्ही गाड्यांच्या मालकांना राज्य सरकारकडून स्वातंत्र्यदिनाची भेट ठरणार आहे. मात्र, या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर वर्षाला 200 कोटींचा भार पडणार आहे.
पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि पेट्रोल, डिझेलच्या वाहनांची संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारने नुकतेच राज्यात नव्याने नोंदणी होणार्या वाहनांपैकी जास्तीत जास्त वाहने इलेक्ट्रिक असावीत यासाठी ‘इव्ही’ धोरण आणले आहे. त्यानुसार ईव्ही धोरण मंजूर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 लाखापर्यंत आणि त्यापेक्षा अधिक जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक गाड्यांवरचा सहा टक्के कर माफ केला आहे.
त्याचबरोबर इलेक्ट्रिक दुचाकी, तीन चाकी, चारचाकी (परिवहनेत्तर), राज्य परिवहन उपक्रमाच्या बसेस तसेच खासगी, राज्य व शहरी परिवहन उपक्रमांतील बसेस यांना मूळ किंमतीच्या 10 टक्के तर इलेक्ट्रिक तीनचाकी मालवाहू वाहने, चारचाकी (परिवहन), चारचाकी हलके मालवाहू वाहन, चारचाकी मालवाहू वाहने तसेच शेतीसाठीचे इलेट्रिक ट्रॅक्टर व एकत्रित कापणी यंत्र वाहनांच्या खरेदीसाठी मूळ किमतीच्या 15 टक्के सवलत दिली आहे.
परिवहन विभाग पेलणार भार
ईव्ही गाड्यांना टोलमाफी देण्याच्या प्रस्तावामुळे सरकारच्या तिजोरीवर वर्षाला 200 हून अधिक कोटींचा भार पडणार आहे. मात्र, पर्यावरणपूरक गाड्यांचा जास्तीत जास्त वापर वाढावा यासाठी टोलचा भार परिवहन विभाग पेलणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाने पुढील पाच वर्षांसाठी सुमारे 12 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.