PM Modi CCS Meeting: मध्यपूर्वेतील संघर्षावर पंतप्रधान मोदींची तातडीची बैठक; सीसीएसमध्ये सुरक्षेचा सविस्तर आढावा Pudhari
राष्ट्रीय

PM Modi CCS Meeting: मध्यपूर्वेतील संघर्षावर पंतप्रधान मोदींची तातडीची बैठक; सीसीएसमध्ये सुरक्षेचा सविस्तर आढावा

ऊर्जा, अर्थव्यवस्था व परदेशातील भारतीयांच्या सुरक्षेवर चर्चा; युएई राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवर संवाद

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (सीसीएस) महत्त्वाची बैठक पार पडली. पंतप्रधानांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या.

सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे उद्भवलेल्या जागतिक परिस्थितीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. विशेषतः या घडामोडींचा भारताच्या सुरक्षेवर, ऊर्जा पुरवठ्यावर, अर्थव्यवस्थेवर आणि परराष्ट्र संबंधांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर चर्चा करण्यात आली. तसेच, परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्याच्या उपाययोजनांवरही विचारविनिमय झाल्याचे समजते.

संबंधित मंत्रालये आणि यंत्रणांना आवश्यक ती तयारी ठेवण्याबाबत सूचनाही देण्यात आल्याची माहिती आहे. केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींचा युएईच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद

इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी संवाद साधला. याबाबत सोशल मीडियावर माहिती देत पंतप्रधान म्हणाले की, यूएईच्या राष्ट्राध्यक्षांशी माझी दूरध्वनीवर चर्चा झाली.

यावेळी यूएईवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आणि या हल्ल्यांत मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारत यूएईसोबत उभा आहे. यूएईमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तणाव कमी करणे, प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य यांना आम्ही पाठिंबा देतो, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT