दिल्ली : भाजपमध्ये कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. 'तुम्ही नाही तर तुमचा मुलगा’ ही मानसिकता स्वीकारली जाणार नाही. घराणेशाही आणि जमीनदारी वृत्तीला भाजपमध्ये थारा नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच नेत्यांना फटकारलं.
पंतप्रधान मोदी दोन दिवस बिहारच्या निवडणूक दौऱ्यावर होते. पहिल्या दिवशी पाटणा येथील भाजप प्रदेश कार्यालयात खासदार, आमदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सुमारे ७० मिनिटे चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदींनी नेत्यांशी संवाद साधला आणि आगामी बिहार निवडणुकीसाठी विजयाचा मंत्र दिला.
निवडणुका आल्या की लोक इतर पक्षात जातात आणि नंतर पुन्हा त्यांच्या पक्षात परततात. अशा लोकांचे महत्त्व कमी होते. पक्षात सर्वात मोठे भांडवल म्हणजे संयम. जर तुम्ही संयम बाळगला तर तुम्हाला आदर मिळेल, अशा कानपिचक्या मोदींनी आपल्याच आमदार खासदारांना दिल्या. मोदींनी भाजपचा आतापर्यंतचा प्रवास आणि पूर्वजांचे बलिदान लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला. विधानसभा निवडणुकीपूर्वी तिकीट वाटपाबाबत स्पष्ट रेषाही आखली. भाजप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदींनी या बैठकीत सांगितले की, भाजप चार पिढ्यांनंतर येथे पोहोचला आहे, तो जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. पूर्वजांचे बलिदान लक्षात ठेवा, त्यांच्यामुळेच आज आपण येथे पोहोचू शकलो आहोत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, राजकारणात घराणेशाही चालणार नाही. जमीनदारी असू नये. जर तुम्ही नाही तर तुमचा मुलगा, असे घडू नये. एक कार्यकर्ता कठोर परिश्रम का करतो? त्याला त्याच्या कष्टाचे फळ का मिळू नये? असा सवाल करत तिकीट वाटपात कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे मोदींनी स्पष्ट केले.
उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांना मोदींनी सांगितले की, सोशल मीडियावर ताकद असेल तरच तिकिटासाठी दावा करा. नेते आणि कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रिय असले पाहिजेत. उमेदवारी हवी असलेल्या कोणत्याही नेत्याचे सोशल मीडियावर किमान ५० हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स असले पाहिजेत. विजयाचा मंत्र देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, बूथ मजबूत करा. बूथ मजबूत असेल तरच तुम्ही निवडणूक जिंकाल. बूथ जिंका, बिहार जिंका. प्रत्येक बूथवर लोकांना मन की बात सांगितली पाहिजे, असे मोदी म्हणाले.
त्यांनी नेत्यांना सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्यास सांगितले. जनतेमध्ये जाऊन सरकारच्या सकारात्मक कामांबद्दल लोकांना सांगा. लोकांना जागरूक करा. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल जनतेला सांगा. दहशतवादाच्या बाबतीत आम्ही पाकिस्तानला ज्या प्रकारे उघड केले, ते लोकांना सांगा. दहशतवादाविरुद्ध कशी कारवाई केली गेली, हे देखील लोकांना सांगण्याची गरज आहे, असेही पंतप्रधान मोदींनी नेत्यांना सांगितले.