नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची परवानगी नाकारणाऱ्या केंद्रीय पुरातत्व विभागाविरोधात शिवप्रेमींनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आगरा किल्ला परिसरात शिवजयंतीची परवानगी नाकारल्याने अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.
यापूर्वी 'आगाखान पुरस्कार' कार्यक्रमासह अदनाना सामीच्या कॉन्सर्टला आगरा किल्ला परिसरात पुरातत्व खात्याकडून परवानगी देण्यात आली होती. पंरतु, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे ११ नोव्हेंबर २०२२ पासून परवानगीसाठी प्रयत्न केले जात आहे. अनेकवेळा पाठपुरावा करूनही शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने थेट उच्च न्यायालयातच दाद मागण्यात आली आहे.आगरा किल्ल्यासोबत ऐतिहासिक संबंध नसणाऱ्यांनादेखील कार्यक्रमाची परवानगी देण्यात येते पंरतु,या किल्ल्यासोबत थेट ऐतिहासिक संबंध असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी नाकारली जाते, असे याचिकेतून याचिकेकर्ते पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
किल्ल्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी देण्याबाबत कुठलेही नियम नाहीत. अशात पुरातत्व खात्याकडून पक्षपातीपणा तसेच मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी केला.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनी यासंदर्भात पाठपुरावा करून देखील परवानगी नाकारण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये रोष आहे.आगरात छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कैदेत ठेवल्यानंतर महाराजांनी किल्ल्यातून सुटका करून घेतली होती.या ऐतिहासिक घटनेला पुन्हा जिवंत करण्यासाठी आगरात शिवजयंती साजरा करण्याचा मानस शिवप्रेमींचा आहे.पंरतु, गेल्या दीड महिन्यांपासून कार्यक्रमाला परवानगी मिळत नसल्याने आता हे प्रकरण न्यायालयात पोहचले आहे.
हेही वाचा :