phone battery explosion thumb lost mobile battery safety
पुढारी ऑनलाईन :
जुन्या स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होऊन दोन भाऊ जखमी झाले. या अपघातात एका विद्यार्थ्याने हाताचा अंगठाही गमावला. स्फोट झाला तेव्हा दोन्ही भाऊ घरी एकटेच होते. तुमच्या घरातही जुने फोन किंवा त्यांची बॅटरी ठेवलेली तर नाही ना, याची काळजी घ्या.
सध्या अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यासाठी ते वर्षभर मेहनत करून अभ्यास करतात. मात्र परीक्षेपूर्वी दोन विद्यार्थ्यांना मोबाईलच्या बॅटरीशी खेळणे महागात पडले. दोघेही सख्खे भाऊ आहेत. या अपघातात एका विद्यार्थ्याचा हाताचा अंगठा गेला असून उरलेल्या चार बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. ही माहिती माध्यमांच्या अहवालांमधून समोर आली आहे.
ही घटना मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यात घडली आहे. अहवालांनुसार एक मुलगा १० वर्षांचा आहे, तर दुसरा त्याचा लहान भाऊ अनुज कुमार आहे. दोघेही घरी एकटे असताना जुन्या मोबाईलच्या बॅटरीशी खेळत होते. त्यावेळी अचानक बॅटरीचा स्फोट झाला. मात्र बॅटरी का फुटली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
जुन्या फोनच्या बॅटरीचे धोके
घरात जुनी स्मार्टफोनची बॅटरी ठेवण्यामुळे अनेक धोके निर्माण होऊ शकतात. ते पुढीलप्रमाणे:
मोबाईलची बॅटरी ठरावीक कालावधीनंतर खराब होते आणि ती फुगते. फुगलेल्या बॅटरीला फुटण्याचा धोका अधिक असतो.
बॅटरी जास्त तापल्यास त्यात शॉर्ट सर्किट होऊ शकते, ज्यामुळे घरातील इतर वस्तूंना आग लागण्याची शक्यता असते.
जुन्या बॅटरीमधून केमिकल लीक होण्याची शक्यता असते. हे केमिकल कपड्यांवर, त्वचेवर किंवा चुकून डोळ्यांत गेले तर ते अत्यंत धोकादायक ठरू शकते.
स्फोट होण्याचा धोका
जुन्या स्मार्टफोनच्या बॅटरीवर जास्त दाब पडल्यास किंवा ती दाबण्याचा प्रयत्न केल्यास बॅटरी फुटू शकते. अशा स्फोटामुळे गंभीर जखम होण्याची शक्यता असते.
जुन्या बॅटरीचे काय करावे?
जुना स्मार्टफोन किंवा त्याची बॅटरी घरात दीर्घकाळ ठेवू नका. बाजारात अनेक स्टार्टअप कंपन्या आहेत ज्या जुने स्मार्टफोन खरेदी करतात. त्यांच्याशी संपर्क साधून फोन विकू शकता. तसेच जुना फोन किंवा त्याची बॅटरी उन्हात ठेवू नका. असे केल्याने बॅटरीचा स्फोट होण्याचा धोका वाढू शकतो.