Petrol in bottles is banned and allowed only in bike tanks, so he just brought the tank without bike
पुढारी ऑनलाईन :
सध्या अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यामध्ये मोठे युद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम देशातील इंधन आणि गॅस टंचाईवर जाणवू लागला आहे. त्यातच देशातल्या प्रत्येक शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. या परिस्थितीतही काही लोक अशा काही करामती करतात की ते पाहणारेही काहीवेळ चक्रावून गेल्याशिवाय राहत नाहीत. अशीच देशातील एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बाटलीत पेट्रोल नेण्यावर बंदी असल्याने एका तरुणाने नियमांचे अक्षरशः पालन करत अनोखा मार्ग अवलंबला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पेट्रोल पंपावर साधारणपणे बाटली, कॅन किंवा इतर भांड्यांमध्ये इंधन देण्यास मनाई असते. त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, या तरुणाने हुशारी दाखवत थेट बाईकची टाकीच हातात घेऊन पंपावर हजेरी लावली.
घडले असे की, संबंधित तरुणाची बाईक बंद पडली होती. जवळपास कोणतीही मदत उपलब्ध नसल्याने त्याने पेट्रोल आणण्यासाठी वेगळाच उपाय शोधला. नियमांनुसार पेट्रोल फक्त वाहनाच्या टाकीतच भरले जाऊ शकते, हे लक्षात घेऊन त्याने बाईकची टाकी वेगळी काढली आणि तीच घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचला. पंपावर उपस्थित कर्मचाऱ्यांनाही हा प्रकार पाहून आश्चर्याचा धक्का बसला.
सुरुवातीला काही क्षण गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, पण नियमांमध्ये कुठेही टाकी वेगळी आणण्यास मनाई नसल्याने शेवटी कर्मचाऱ्यांनी त्याला पेट्रोल भरून दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांकडून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी तरुणाच्या कल्पकतेचे कौतुक केले, तर काहींनी नियमांतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या व्हिडिओत पोलिस त्याला दुसरी गाडी घेवून यायची नाही का? असा प्रश्न विचारत आहेत. त्यावर तो तरूण कोणी देत नाही म्हणून गाडीची टाकी काढून आणल्याचे म्हणत आहे. यानंतर पेट्रोल गाडीच्या टाकीत भरून तो तरूण तेथून निघुन जातो. यावेळी पेट्रोल पंपावरील इतर वाहनधारक हे दृष्य पाहून मोठमोठ्याने हसत असल्याचे दिसून येत आहेत.
या घटनेमुळे अशा प्रकारे गाडीची टाकी काढून त्यात पेट्रोल घेता येते का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. तर दुसरीकडे सामान्य माणूस अडचणीत सापडल्यावर कसा वेगळा मार्ग शोधतो, याचेही उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.